बारामतीत सुळे-कुल लढत चुरशीचीच…

मतदारसंघात अनेक प्रश्‍नांची सरमिसळ; प्रत्येक मतदारांचा कौल महत्त्वाचा

बारामती- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामतीचा गड राखणार का? त्यांचे मताधिक्‍य वाढणार की घटणार? कमळाच्या चिन्हाचा कांचन कुल यांना किती फायदा होणार? अशी चर्चा बारामती मतदारसंघात होती.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, भोर, इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना चांगला कौल मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटत आहे. पण, त्याचबरोबर दौंड, खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघात कांचन कुल याचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगतात. त्यामुळे सुळे आणि कुल यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.

विशेष म्हणजे, बारामतीची निवडणूक भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितल्याने सुळे यांच्या विजयाची खात्री समर्थकांना वाटू लागली आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळमध्ये जास्त ताकद लावली. त्यामुळे त्यांचे बारामतीकडे दुर्लक्ष होतेय का? असाही सवाल त्यांना विचारला जात होता. पण, या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना एक लाखापेक्षाही जास्त मताधिक्‍य मिळेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अशी लढत होती. त्यावेळी महादेव जानकर कपबशीच्या चिन्हावर लढले होते. सुप्रिया सुळे यांना तेंव्हा केवळ 69 हजारांचे मताधिक्‍य होते. आता, कांचन कुल कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने त्यांनी सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. परंतु, असे असले तरी शेवटच्या टप्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर आणि बारामतीत सभा घेऊन बारामतीकरां भावनिक आवाहन केले आहे. पवार ज्या-ज्यावेळी बारामतीत सभा घेतात त्या-त्यावेळी पक्षाचा विजय होत असतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे हे कांचन कुल यांच्या पाठिशी आहेत, त्यामुळे दौंड, खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदान वाढले तर त्याचा फायदा कांचन कुल यांना होऊ शकतो. असे असलं तरी कॉंग्रसचे संजय जगताप यांनी पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार केला आहे, त्यामुळे पुरंदरमध्ये सुळे यांच्याही बाजू वरचढ मानली जात आहे.

बारामती हा माझा मतदारसंघ आहे, तुम्ही इथे येताना विचार करा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत 24 गावांच्या पाण्याचा प्रश्‍न गाजला होता. आता, मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या गावांना हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. ही बाब लक्षात घेता बारामतीचे मतदार सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल देतील, अशी शक्‍यता आहे.

खेड आणि इंदारपूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते सुप्रिया सुळे यांना किती मदत करतात, यावर येथील निकाल अवलंबून आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती. पण, सुप्रिया सुळे यांना या भेटीचा किती फायदा होतो, हे मात्र आताच सांगता येणे कठीण आहे.

दरम्यान, कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खडकवासल्यामध्ये सभा घेतली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीत दोन आठवडे मुक्काम ठोकला होता. पण, या दिग्गजांच्या प्रचारामुळे आम्हालाच जास्त मते मिळतील, असा दावा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केल्याने बारामतीकर नेमके कोणामागे थांबातात, हे दि. 23 मे निकालाच्यावेळीच स्पष्ट होणार आहे.

  • धनगर आरक्षणाचा मुद्दा
    दौंड आणि इंदापूरमध्ये धनगर समाजाची संख्या अधिक आहे. गेल्या वेळी इथे सुप्रिया सुळेंच्या विरोधात जास्त मतदान झाले. त्या निवडणुकीत धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु, ते आश्वासन पूर्ण न झाल्याने हे मतदार आता राष्ट्रवादीकडे वळू शकतात.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)