बारामतीत राबविणार प्लॅस्टिकमुक्त मोहीम

मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून कडक अंमलबजावणी

बारामती- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक अधिसूचना 2018 अन्वये अशा वस्तुंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री व वाहतूक करण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. त्यानुषंगाने बारामती शहरामध्ये पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी राबविण्यासाठी नगरपरिषदेमार्फत दि.01 ते 05 मे 2018 या कालावधीमध्ये प्लॅस्टिक संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे.

प्लॅस्टिक मुक्त बारामतीकरीता नगरपरिषदेने प्लॅस्टीक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये प्लॅस्टीक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅंडल असलेल्या व नसलेल्या) तसेच थर्माकोल (पॉलिस्टायरिन) व प्लॅस्टिक पासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणऱ्या डिस्पोजेबल वस्तू, उदाहरणार्थ ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक व प्लॅस्टिक वेष्टन इत्यादींचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली आहे.

याकरीता सर्व शासकीय व अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक संस्था, समारंभाचे हॉल, व्यावसायिक संस्था, कार्यालये, हॉटेल्स, ढाबे, दुकानदार, मॉल्स, विक्रेते, केटरर्स, व्यापारी, फेरीवाले, वाहतूकदार, भाजीपाला विक्रेते, सर्व व्यावसायिक व नागरिक यांनी नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मा. अध्यक्षा व मा. मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांनी केले आहे.

नगरपरिषदे मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक संकलन मोहिमेमध्ये आपणाकडे येणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे सर्व व्यावयासिक व नागरिकांनी आपणाकडे उपलब्ध असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या (कॅरिबॅग्ज), प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वर नमूद असणाऱ्या सर्व वस्तू विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद यंत्रणेकडे अथवा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे दिनांक 05 मे 2018 पर्यंत जमा करुन पर्यावरण रक्षणासाठी व शहर प्लॅस्टिक मुक्त्‌ करण्यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी केले आहे. यानंतरही बंदी घातलेले प्लॅस्टीक साहित्य आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई नगरपरिषदेच्या मार्फत करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)