बारामतीत भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते भिडले

परस्पर विरोधी तक्रारीवरुन नऊ जणांवर गुन्हा दाखल

बारामती- शहरातील सातववस्ती येथे लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मंगळवारी (दि. 23) मतदान केंद्रावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी बुधवारी (दि. 24) रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज सातव यांच्यासह भाजपचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत सातव यांचाही समावेश आहे.

दिनकर धोंडीबा काटे (रा. माळेगाव रोड, शिवाजीनगर, कसबा, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज दत्तात्रय सातव, गणेश लहू सातव, संतोष रामचंद्र जाधव, गौरव उर्फ एक्‍या हनुमंत सातव व विकी चंद्रकांत जामदार (सर्व रा. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे या केंद्रावर मतदान प्रतिनिधी म्हणून काम करून घरी जात असताना हनुमान मंदिराजवळ आले असताना आरोपींनी पाठिमागून पळत येवून त्यांना मारहाण करत जमिनीवर पाडले. गौरव सातव याने पाठीवर मारत खिशातील 1700 रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

गणेश लहू सातव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत (नाना) सातव, अजित साळुंखे, जाधव, नवनाथ भोसले (सर्वांची पूर्ण नाव नाही, रा. बारामती) या चौघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सातववस्ती येथे ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मतदान संपल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ, दमदाटी केली. ते फिर्यादीच्या भावाला मारहाण करत असताना फिर्यादि तेथे सोडविण्यासाठी गेले असताना आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून मारहाणीचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी हे सूरज सातव यांना घरी सोडण्यासाठी जात असताना फडतरे यांच्या विहिरीजवळ आले असताना आरोपींनी जमाव करून फिर्यादीला मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी बळजबरीने ओढून खिशात घातली असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान परस्परविरोधी या दोन तक्रारींसह पोलिसांकडूनही दोन्ही गटातील नाना सातव व गणेश सातव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी किशोर वीर यांनी याबाबत फिर्याद दिली. सातववस्ती मतदान केंद्रावर फिर्यादी हे बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावत असताना नाना व गणेश सातव यांनी मतदानाच्या कारणावरून सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी भांडत सार्वजनिक शांततेचा भंग केला असल्याचे फिर्यादीत नमूद्‌ केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)