बारामतीतील सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

बारामती– आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा गगनभेदी घोषणा देत बारामतीतील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसह शेकडो कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट होता तर कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय भवन येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या संपामुळे सर्वसामान्य लोकांच्या कामांचा खोळंबा झाला.
राज्य सरकारी सेवेतील अधिकारी व कार्मचाऱ्यांना जानेवारी 2019 पासून थकीत महागाई भत्यासह सातवा वेतन आयोग लागू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तरीही कर्मचारी संपावर ठाम राहत आज (मंगळवार) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सरकारी कर्मचारी संपावर गेले. बारामती येथील प्रशासकीय भवनासह बांधकाम, पाटबंधारे, उपप्रदेशिक परिवहन विभागासह अन्य विभागातील कर्मचारी अधिकरी संपात सहभागी झाले आहेत.

  • झेडपी शाळा, नगरपरिषद सुरळीत
    जिल्हा परिषद शाळा तसेच शिक्षक संघटनांनी या संपास पाठिंबा जाहीर केला असला तरी बारामती तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळा नियमित सुरु होत्या. त्याचबरोबर बारामती नगरपरिषदेचे कर्मचारी या संपात सहभागी झाले नाहीत, त्यामुळे नगरपरिषदेचे कामकाज सुरळीत सुरू होते. तर ग्रामसेवक आणि केंद्रप्रमुख ही या संपात सहभागी झाले आहेत.
  • दस्त कार्यालय सुरू
    महसूल, भूमिअभिलेक तसेच कृषी विभागाचे कर्मचारी संपावर गेले असले तरी सहायक दुय्यम निबंधक वर्ग 2 ची कार्यालये वरीष्ठांच्या आदेशाने सुरू असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही कार्यालयात दुपारी 4 वाजेपर्यंत 36 दस्त नोंदवण्यात आले. तर नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
    चौकट : कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
    सातव्या वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी
    अंशदायी पेन्शन योजना रद्द करा
    महागाई भत्त्यात वाढ करावी
    निवृत्तीचे वेतन 60 वर्षे करा
    रिक्तपदे तत्काळ भरा
    शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)