बारामतीच्या जिरायत भागात दुष्काळाच्या झळा

  • विहिरी कोरड्या पडल्या, पिके जळाली ः पाणी टंचाईचे संकट तीव्र

सोमेश्‍वरनगर -बारामतीच्या जिरायत भागात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. जिरायत भागातील सोळा गावांतील भूजल पातळी कमालीची घटली असून विहीरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतीतील पिके जळून गेली आहेत. तर गुराढोरांनाही पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. यामुळे दूध उत्पादन घटले आहे.
बारामती तालुक्‍यातील सोळा गावे कायम दुष्काळी असतात. या भागात ओढा खोलीकरण, नाला बलडींग आदी कामे कमी प्रमाणात असल्यामुळे याठिकाणी पाणीटंचाई सतत भासत असते. जिरायित भागातील मोढवे, मुर्टी, जोगवडी, पळशी, मोराळवाडी, मुढाळे, लोणी भापकर, सायंबाची वाडी, काऱ्हाटे, बाबुर्डी, अंजनगाव, जळगाव व भिलारवाडी या गावांना एप्रिल ते मे महिन्यात पाण्यासाठी दुष्काळाशी सामना करावा लागतो. मासाळवाडी, भिलारवाडी या गावांनी पंचायत समितीकडे टॅंकरची मागणी केली आहे. जिरायत पट्ट्यात 33 गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलयुक्‍त शिवारची कामे सुरू आहेत. या कामात सहभाग घ्यावा म्हणून पाणी फाऊंडेशन तालुका समन्वयक मयूर साळुंके व पृथ्वीराज लाड यांनी आवाहन केले आहे. काही जिरायत पट्ट्यातील ओढा खोलीकरण, रूंदीकरण यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील गावांना पाणीटंचाई भासत नाही.
पळशी, मोराळवाडी, काऱ्हाटी, मासाळवाडी या ठिकाणी पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात खालावली असल्याने चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पळशी परिसरात पाण्यावाचून पिके जळून चालल्याने मेथीच्या शेतात शेतकऱ्यांनी बकऱ्या सोडल्या आहेत. या भागात चारा व इतर पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून बंधारे पाझरतलाव भरावेत अशी मागणी या 16 गावातील शेतकरी करू लागले आहेत. योजनेचे टेस्टींग राहिलेल्या ठिकाणी मोफत टेस्टींगचे पाणी सोडावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

या 16 गावांचा पाणीटंचाईचा सर्व्हे चालू असून सात गावांची टॅंकरची मागणी आमच्याकडे आलेली आहे. त्यानुसार आम्ही टॅंकर सुरू करणार आहोत. त्याचबरोबर तहसीलदार व आम्ही सर्वजण उद्या या 16 गावांत प्रत्यक्ष भेट देऊन पाणीटंचाईवर मार्ग कसा काढावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
-प्रमोद काळे, गटविकास अधिकारी

जलयुक्‍त शिवार ओढा खोलीकरण यामुळे जानेवारीमध्ये जाणवणारी पाणीटंचाई आता मेमध्ये जाणवत आहे. शेळ्या, मेंढ्या, दुभती जनावरे यांना ओला चारा कमी पडू लागल्याने त्याचा दुधावर परिणाम झाला आहे.
-चंद्रकांत गुलदगड, शेतकरी पळशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)