बारामतीकरांचे आरोग्य “व्हेंटिलेटर’वर

 • वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे रुग्णांची हेळसांड : रुग्ण धरताहेत खासगी दवाखान्याची वाट

प्रमोद ठोंबरे
बारामती, दि. 5 – बारामतीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून शहरात तीन शासकीय रुग्णालये कार्येरत आहेत. त्यामध्ये महिला रुग्णालयाचा देखील समावेश आहे. एकूण 230 बेडची क्षमता या रुग्णालयांची आहे. सिल्व्हर ज्युबिली तसेच रुई ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी 100 बेड प्रस्तावित आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या या रुग्णालयात मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे विदारक चित्र सध्या बारामतीत आहे. वैद्यकीय अधिकारी कामाच्या वेळेत जागेवर नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. अत्याधुनिक रुग्णालये असताना देखील शासकीय योजनांच्या लाभापासून बारामतीकर वंचित आहेत.

 • कामचुकार वैद्यकीय अधिकारी
  शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात प्रतिदिन 200 ते 300 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद बाह्य रुग्ण विभागात होते. मात्र, या सर्वांवर या रुग्णालयात उपचार होतीलच असे नाही. वरीष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा हे त्यातील एक महत्त्वाचे करण आहे. बरेचदा ओपीडीच्या वेळेस हे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कक्षातून गायब असतात. ते कोठे जातात काय करतात याची कल्पनाही कोणाला नसते. त्यामुळे रुग्णांना प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे बहुतांश रुग्ण अनेकावेळा खेटा मारुन कंटाळल्यानंतर खासगी रुग्णालयाचा रस्ता धरातात.
 • सोनोग्राफी सेंटर बंद
  शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सोनोग्राफीसाठी रुग्णांना खासगी सेंटरमध्ये जावे लागत आल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सोनोग्रफी सेंटर का बंद आहे. केव्हा सुरू होणार याची कल्पना येथील प्रशासनाला देखील नाही. यापूर्वी हे सोनोग्रफी सेंटर सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या मात्र ते बंद अवस्थेतच आहे.
 • रुग्णांनी फिरवली त्या विभागाकडे पाठ
  सिल्व्हर ज्युबिली रुग्णालायात अंतररुग्णांचे प्रमाण खुपच कमी आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने रुग्णांनी या विभागडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे 100 बेडच्या या रुग्णालयातील 50 बेड रिकामेच पडलेले असतात. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. वैद्यकीय सेवा देण्यात रुग्णालय कमी पडत असल्याची भावना रुग्णांसह नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.
  चौकट : स्त्रिरोगतज्ज्ञ नसल्याने गैरसोय
  गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात स्त्रिरोगतज्ज्ञ नाहीत, त्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे यापूर्वी कार्येरत असलेल्या स्त्रिरोगतज्ज्ञ पटेल यांची तीन महिन्यांपूर्वी रुई येथे बदली झाली आहे. त्यानंतर या रुग्णालयातील स्त्रिरोगतज्ज्ञांची जागा अद्याप रिकामी आहे. हृदयरोगतज्ज्ञांचा देखील या रुग्णालायालात अभाव आहे, त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयचा रस्ता दाखविला जात आहे.
 • रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे
  सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. रुग्णालयासाठी स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर असल्याचे डॉक्‍टर सांगतात. मात्र, रुग्णालयाच्या आवारात ती अस्तित्वात नाही. रुग्णालयातून फोन आल्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या वेळेनुसार रुग्णालयात पोहोचतात. तर रात्रीच्यावेळी या रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसेच असते.

सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात स्वतंत्र पोलीस चौकीचे कोणतेही आदेश नाहीत; परंतु रुग्णालयाच्या मागणीनुसार किंवा तणावपूर्ण काळात बारामती शहर पोलीस ठाण्यातून रुग्णालयास पोलीस संरक्षण दिले जाते.
– अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, बारामती शहर

रुग्णालयात सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यातच दिवसेंदिवस लोकसंख्या ही वाढत असल्याने त्याचा अतिरिक्‍त ताण यंत्रणेवर येत आहे. शासनाचे अनेक उपक्रम असतात त्यासाठी डॉक्‍टरांना त्यात सहभागी व्हावे लागते वेळप्रसंगी बाहेरही जावे लागते त्यावेळेस डॉक्‍टर जागेवर दिसत नसतील. यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढविले पाहिजे तसेच विविध पदांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
– मीरा चिंचोलीकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)