बारसे, लग्नाला उपस्थिती दाखवून जनता मते देत नाही : शिवतारे

विकास कामे करणाऱ्यांच्या मागे जनता ठाम उभी ः सोनापूर येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन

नागठाणे – सोनापूर गावच्या विकासासाठी सुमारे 17 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. यातील एम. आय. टॅंक सारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट होईल. जनता सुज्ञ झाली असून केवळ बारसे, लग्न, तिसरा, दहावा या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत. माणूस आपल्या कर्तृत्ववाने मोठा होतो. जनता आता जो विकासकामे करील त्याच्याच पाठीशी उभी रहाते असे प्रतिपादन पालकमंत्री व जलसंपदा तथा जलसंधारण राज्य मंत्री विजयबापू शिवतारे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोनापूर (ता. सातारा) येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटन व भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, वर्णे जि. प. गटाचे सदस्य मनोजदादा घोरपडे,नागठाणे जि. प. सदस्या भाग्यश्री मोहिते, पंचायत समिती सदस्या विजया गुरव, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, सरपंच पुष्पलता नावडकर, उपसरपंच राहुल बागल, के.एम. शुगरचे संचालक युवराज साळुंखे, उमेश नावडकर, शिवसेना कराड उत्तर उपविभाग प्रमुख शंकर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, एम. आय. टॅंकच्या माध्यमातून सोनापूर गावांसह परिसरातील अन्य गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. सोनापूर सारख्या छोट्या गावासाठी जवळपास 17 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळविण्यासाठी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह येथील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे. असेच गावाने एकत्र येऊन गावचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

या वेळी बोलताना शेखर चरेगावकर म्हणाले की, हे सरकार सर्वसामन्य जनतेचे सरकार आहे. जनता हाच घटक म्हणून हे शासन विकासात्मक धोरण राबवित आहे. कराड उत्तर मतदारसंघात मनोजदादा घोरपडे यांनी विकासकामांचा जो झंजावात निर्माण केला आहे. त्यामुळे कराड उत्तरचे भविष्यातील आमदार मनोजदादा घोरपडेच असतील असे उद्गारही यावेळी त्यांनी काढले. यावेळी मनोजदादा घोरपडे यांच्यासह अन्य मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली.

तत्पूर्वी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोनापूर येथील एम. आय. टॅंक, मुख्यमंत्री पेयजल योजना तसेच दलित वस्ती सभामंडप व सोनुबाई तळे संरक्षक भिंत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी विजय नावडकर, उत्तम (आप्पा) बागल, धनाजी नावडकर, शंकर बागल यांच्यासह सोनापूर परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजनकुमार घाडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश नावडकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)