बाप्पा मोरया रे…बाप्पा मोरया !!! (प्रभात Open House)

बाप्पा येण्याची चाहूल लागताच सर्वत्र वातावरण कसं अगदी आनंदून जातं.. आधीच त्याच्या आगमनाची व्याकुळता लागलेली असते. लहान असो वा थोर प्रत्येक जण बाप्पाच्या येण्याची आतुरतेने वाट पहात असतो. १० दिवसाचा गणेशोत्सव म्हणजे आनंदाला पर्वणीच. सर्वत्र धम्माल.. ढोल-ताश्यांचा गज्जर घुमतो, लाडक्या बाप्पाची गाणी पडू लागतात कानात… सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

गणेश मूर्ती किती भावते म्हणून सांगू मला…बाप्पाचे सुंदर रूप त्या मूर्तीकाराने साकारलेले आसते… किती लोभस, सुंदर पहातच बसावे… अगदी न पापणी झाकता…कितीही प्रयत्न केला त्याला डोळ्यात साठवण्याचा तरीही त्याला पाहण्याचा मोह आवरताच येत नाही. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी कित्येकांनी आपल्या लाडक्या बाप्पाची शाडू मूर्ती आपल्या हाताने साकारलीय. लहान होतो तेव्हा गणपती येणार म्हणता १५-२० दिवस आधीच बाप्पासाठी छोट्या काठ्यांपासून घर बनवायला घेत असे मी.. त्याला स्केचपेनने नक्षी काढत… लाईटच्या माळ लावणे, त्याच्यासाठी सुंदर रंगीबेरंगी कपड्यांचे छत बनवत. किती आनंद होता या सर्व गोष्टीत. बाप्पाला किती-किती सजवायचं…  हे झालं घरचं,  बाहेर मंडळातले बाप्पा खूप मोठे. शाळेला सुट्टी मारून बाप्पा पाशीच बसायचं. दिवसभर गाणी वाजत राहायची. आणि मंडळात रांगोळी, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा ह्या स्पर्धा घेतल्या जात..आणि जिंकणार्याला बक्षीस भेटायचं. शिवाय या काळात पडद्यावर हिंदी, मराठी चित्रपट दाखवले जायचे.. संध्याकाळीच चित्रपटाची नावे पुकारली जायची…  सर्व वस्ती जमायची चित्रपट पाहण्यासाठी.

सद्य  स्थिति पाहता गणेशोत्सवाचे स्वरूप बदलताना पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी बाप्पांची गाणी लावली जात स्पीकर वर त्याची जागा DJ नी घेतलीय आणि मोठ्या आवाजात रिमिक्स,आचरट गाणी कानी पडतात… लेझीमची जागा अशा गाण्यांच्या तालावर नशेत थरकण्याने घेतलीय. गणेशोत्सव सुरु करण्यामागचं टिळकाचं स्वप्न जात-पात, धर्म-भेद विसरून एकत्र येण्याचं होतं… पण आता मात्र मंडळांची चढाओढ दिसत आहे प्रत्येक बाबतीत. एकमेकांविषयी द्वेष-मत्सर दिसत आहे. बाप्पा तुझं नाव “विघ्नहर्ता” आहे तेव्हा तु हे विघ्न नाहीसं कर रे एवढच तुला मनापासून मागणं आहे.

यंदाचं गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे याचं औचित्य साधून मी माझ्या सर्व ‘युवा स्पंदन” च्या कार्यकर्त्या सोबत ‘मोदक बीजगोळे’ बनवले आहेत आणि बाप्पाचा प्रसाद म्हणून मंडळांना ते देऊन निसर्ग संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलला आहे.

– जीत शिंदे, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)