बाप्पा पावला…  चालक-वाहक व शिपायांना बढतीमध्ये 25 टक्के आरक्षण 

दिवाकर रावते यांची घोषणा 
मुंबई: एसटी महामंडळातील चालक-वाहक, सहाय्यक तसेच शिपाई या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला आहे. एसटी महामंडळातील लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-3 मधील बढती प्रक्रियेत या चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांना 25 टक्के जागा राखीव ठेवणार असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली. रावते यांची ही घोषणा म्हणजे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर कर्मचाऱ्यांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
एसटी महामंडळाच्या परिवहन सेवेत चालक-वाहक, सहाय्यक व शिपाई म्हणून एकाच पदावर रूजू होऊन तसेच 30 ते 35 वर्षे सेवा बजावूनही आहे त्याच पदावर निवृत्त होत आहेत. दरवर्षी नित्यनियमाने मिळणारी वेतनवाढ सोडल्यास त्यांना पुढील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान मिळत नव्हते. त्यामुळे शैक्षणिक पात्रता असतानाही त्यांना वर्षोनुवर्षे एकाच पदावर काम करावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये निराशा पसरली होती. एसटी महामंडळात सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी 60 ते 70 हजार कर्मचारी चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई या विविध चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत.
चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांच्या मनातील निराशा पाहून महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांना सुखद धक्का देत महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता व सेवाज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-3 मध्ये बढती दिली जाणार आहे. या बढतीमध्ये त्यांच्यासाठी 25 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे रावते यांनी घोषित केले असल्याची माहिती महामंडळाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)