बाप्पा निघाले गावाला…!

सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन : ढोल ताशांचा दणदणाट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि निगडी परिसरात सातव्या दिवशी गणरायांचे विसर्जन मोठ्या भक्‍तिभावाने करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळांच्या मिरवणुका दुपारी तीन नंतर सुरू झाल्या तर घरगुती बाप्पा सकाळपासूनच विसर्जन घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. शहरात सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशा पथक, लेझिम पथक, जहाज पथक ही सर्व पथके मिरवणुकीसाठी सकाळपासूनच सज्ज झाली होती. तशी व्यवस्था पिंपरी-चिंचवड महापालिका, सामाजिक संस्था व पर्यावरणवादी संघटनांच्या मदतीने करण्यात आली आहे. \

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटाची दुरुस्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानेही गणपती विसर्जन घाटाची साफसफाई केली आहे. गणपती उत्सवासाठी रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, बिर्ला हॉस्पिटल शेजारील विसर्जन घाट, काळेवाडी आदी परिसरातील घाट स्वच्छ करण्यात आले आहेत. नदीपात्रात गणपती विसर्जनामुळे नदीचे पाणी दूषित होते. त्यामुळे नागरिकांनी नदीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन न करता काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या विसर्जन हौदामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी महापालिका प्रशासन, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पर्यावरणवादी संघटना नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसत होते.

या हौदामध्ये नागरिकांनी पुन्हा कचरा टाकून अस्वच्छ करू नये, म्हणून लोखंडी झाकण बसवून तात्पुरते बंद करून ठेवण्यात आले. गणेश मंडळांना गणपती विसर्जनासाठी रात्री उशीर झाल्यास त्यांच्या सोयीसाठी घाटावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. गणेश विसर्जन घाटाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जसा जसा सूर्य मावळू लागला तसे तसे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. कित्येक ठिकाणी मंडळांनी साउंड सिस्टीमच्या जोरावर परिसर दणाणून सोडला. मंडळांच्या दुपारनंतर रांगा सुरू झाल्या आणि मुख्य मार्गाने होत विसर्जन घाटाकडे पोहचत होत्या. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)