बाप्पांना आज निरोप

विसर्जनासाठी मंडळांची तयारी पूर्ण : महापालिका, पोलीस प्रशासनही सज्ज

मिरवणुकांचे प्रमुख आकर्षण

– शहरातून सुमारे 2 हजार मंडळे
– आकर्षक रथांची परंपरा कायम
– राजाराम मंडळातर्फे लक्ष्मीनारायण रथ
– ढोल-ताशा-ध्वज पथकांचा यंदाही “नाद’

पुणे – विसर्जनासाठी मंडळांची तयारी पूर्ण झाली असून, लक्ष्मी रस्ता या मुख्य मार्गावरील गणेश मंडळांनी शनिवारी सकाळपासूनच मंडप उतरवण्याला सुरूवात केली. त्यामुळे विसर्जन मार्गावरील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. गणेशविसर्जनासाठी मंडळाची तयारी पूर्ण झाली असून मंडळांनी आकर्षक रथांचीही तयारीही पूर्ण केली आहे. शहरात सुमारे दोन हजार मोठी मंडळे असून, शहराच्या विविध रस्त्यांवरून ही मंडळे जाणार असल्याने रस्त्यांवर बॅरिकेडींगचे नियोजन, खड्डे बुजवणे अशी कामेही महापालिका आणि पोलिसांनी केले आहे.

-Ads-

गणेशाला वाजत-गाजत निरोप देण्यासाठी विविध मंडळांनी रथांची “थीम’ ठरवली आहे. त्यामध्ये मानाच्या गणपतींशिवाय दगडूशेठ, मंडई, बाबू गेनू, भाऊ रंगारी या मंडळांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय ज्या-ज्या मंडळांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्यांनीही हे वर्ष साजरे करण्यासाठी विविध पद्धतीचे रथ तयार केले आहेत. सदाशिव पेठेतील राजाराम मंडळाने 127 व्या स्थापनावर्षानिमित्त दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा अविष्कार असलेला लक्ष्मीनारायण रथ तयार केला आहे. या रथातून बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

हा रथ 14 फूट रुंद आणि 12 फूट लांब असून 22 फूट उंच असणार आहे. रथावर कलाकुसर केलेले खांब, लक्ष्मीची मूर्ती, हत्तीच्या मूर्ती असणार आहेत. तसेच रथावर आकर्षक झुंबर, रंगीबेरंगे दिवे बसवण्यात आले असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणुकीमध्ये वाद्यवृंद ढोल-ताशा पथक, गजवक्र ढोल ताशा पथक, गंधार ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे. मंडळाच्या उत्सव मंडपासून रविवारी संध्याकाळी 7 वाजता मिरवणूक निघणार आहे.

नेनेघाट गणेशमंडळ आणि व्यायामशाळेचेही यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या मंडळाची दरवर्षी कुमठेकर रस्त्याने मिरवणूक काढण्यात येते, मात्र यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त लक्ष्मी रस्त्याने सांगता मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मंडळाचा विठ्ठल-रुक्‍मिणीचा रथ हे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. संध्याकाळी सहा वाजता पारंपरिक पुणेरी वेशात मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. रथावर विठ्ठल-रुक्‍मिणी यांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या रथाची उंची 26 फूट असून 15 फूट रुंद आहे. मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी ढोल-ताशा-ध्वज पथक आणि नेनेघाट मंडळाचे स्वत:चे ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)