बाप्पांच्या मूर्तींना फायनल टच

आळंदी- गणेशोत्सव अवघा महिन्यावर येऊन ठेपल्याने घरगुती गणेशमूर्तीबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या मोठया मूर्तीच्या कामांना चांगलाच वेग आल्याचे चित्र चऱ्होली बुद्रूक येथील कारखान्यात आहे.
आळंदी येथुन जवळच असलेली चऱ्होली बुद्रुक येथील अनुभवी मालक व कारागिर रामचंद्र बबन कुंभार हे वंशपरंपरागत गेली अनेक वर्षांपासून गणपती बाप्पांच्या विविधरंगी, निरनिराळ्या आकारमानात शाडू माती व पीओपीचा वापर करून अतिशय सुरेख, मनमोहक, सुंदर व आकर्षक अशा बाप्पांच्या मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. कुंभार म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून शाडूच्या मूर्तीना मागणी वाढत असली तरी मातीची मूर्ती बनवणारे कारागीर मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना मूर्तिकारांना करावा लागत आहे. त्यातच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मूर्ती ओल्याच राहत आहेत.
कुंभार यांच्या कारखान्यात सध्या लहानात लहान बाप्पांच्या मूर्तीपासून ते मोठमोठ्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या घरातील लहान-मोठ्या माणसांसह 10 कारागिर बाप्पांची मूर्ती साकारण्याच्या कामात गुंतली आहेत. तर आपली मूर्ती तयार झाली का, हे याचे औत्सुक मूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्या मंडळाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. इको फ्रेंडली मूर्ती, मखर आणि गणेश उत्सव साजरा करण्यावर अधिक भर दिला जात असल्याने यंदा शाडूच्या मूर्तीना अधिक मागणी असली तरी मूर्ती साकार करताना मूर्तिकारांसमोर अनेक अडचणी येत आहेत, असे मूर्तिकार रामचंद्र कुंभार यांनी सांगितले. पावसामुळे मातीच्या मूर्ती सुकल्या जात नाहीत. त्यामुळे साकारलेल्या मूर्तीची माती गळून पडते. या मूर्ती पुन्हा नव्याने साकाराव्या लागत आहेत. पावसामुळे काम दुपटीने वाढले आहे. मातीची एक मूर्ती साकारण्यासाठी तब्बल दोन ते तीन दिवस लागतात. मात्र पीओपीच्या एका दिवसांत 30 ते 35 मूर्ती बनवल्या जात आहेत. माती मळण्यापासून ते मूर्ती बनवण्यापर्यंत सर्वच ठिकाणी कारागिरांना कौशल्याने काम करावे लागत आहे.

  • तर मूर्ती मिळत नाही
    गुढीपाडव्यानंतर गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू होते. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी शाडूच्या मूर्तीना मोठ्याप्रमाणात मागणी असली तरी ग्राहक ऐनवेळी येत असल्याने त्यांना मूर्ती मिळत नाहीत. ग्राहकांनी एक अथवा दोन महिने अगोदरच बुकिंग केल्यास त्यांना मातीची मूर्ती मिळू शकते, असेही कुंभारकर यांनी सांगितले.
  • श्रीविठ्ठलाच्या रुपातील बाप्पांना मागणी
    गणेश भक्‍तांसाठी 135 रूपयांपासून तर 5 हजार रुपयापर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर सार्वजनिक मंडळांसाठी 25 हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे कुंभार यांनी सांगितले. दरवर्षी 6 ते 8 हजार मूर्ती बनविण्यात येतात. यंदाच्या वर्षीचे नवीन आकर्षण म्हणून श्रीविठ्ठलाच्या रूपातील सुमारे सहा फुट उंचीची मूर्ती बनविण्यात आली असून त्यास सर्वाधिक मागणी असल्याचे मूर्तीकार रामचंद्र कुंभार यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)