बाप्पांच्या आगमनासाठी ढोल-ताशे दुमदुमू लागले

रहाटणी – वर्षभर गणेशभक्‍त ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात, तो गणेशोत्सव आता जवळ येऊ लागला आहे. सर्वांच्या लाडक्‍या बाप्पांचे स्वागत ढोल-ताशाच्या गजरात करण्यासाठी ढोल-ताशा पथकातील सदस्य आतापासूनच सराव करीत आहेत. रोज सायंकाळपासून रहाटणी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ढोल-ताशांचा आवाज घुमू लागला आहे.

यावर्षी गणरायांचे 13 सेप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. पुढील दहा दिवस म्हणजेच 23 सप्टेंबरपर्यंत बाप्पा आपल्यासोबत असणार आहेत. बाप्पांच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत मोठा उत्साह दिसून येत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी प्रत्येकजण तयारीला लागला आहे. सर्वाधिक तयारी ढोल-ताशा पथकांची सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जसजसा दिवस मावळू लागतो, तसतसे शहरात ढोल-ताशा पथकांचे आवाज घुमायला सुरुवात होते. नवनवीन सदस्यांकडून तयारी करुन घेण्यासाठी तरबेज वादकांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशांनी डीजेला देखील पछाडले आहे. या पारंपरिक वाद्यांना मिळालेल्या पुन: जीवनामुळे सध्या लहान मुले आणि तरुणाई देखील ढोल-ताशा वादनाकडे आकर्षित होत आहे.

पथकांची जुळवा-जुळव
आपले पथक मोठे आणि वादनात सर्वोत्कृष्ट व्हावे, यासाठी पथकांतील जुन्या आणि वरिष्ठ वादकांची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. सदस्य वाढल्यास नवे ढोल-ताशा आणणे, जुन्या ढोल-ताशांची दुरुस्ती, पाने बदलणे, अशी कामे करून घेण्यात आली आहेत. पथकांना नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था, पथकातील सदस्यांसाठी नवे गणवेश अशा कित्येक बाबींसाठी आर्थिक जुळवा-जुळव देखील पथकांतील वरिष्ठांना करावी लागते. परंतु हे सर्व काही करून सध्या सरावावर जोर दिला जात आहे.

नोकरी-घरकाम सांभाळून सराव
गेल्या काही वर्षांमध्ये ढोल-ताशा पथकांमध्ये महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. किशोरवयीन मुलींपासून गृहिणींपर्यंत सर्व वयोगटातील महिला ढोलांचा सराव करीत आहेत. कॉलेज, नोकरी, घरकाम या सर्व बाबी सांभाळून महिला सरावाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला व मुली घरातील सर्व कामे सकाळी लवकर उठून पूर्ण करून ठरलेल्या वेळेत सरावाच्या ठिकाणावर पोहचतात. दिवसभराच्या कामानंतरही थकवा जाणवू न देता मोठ्या उत्साहाने महिला वर्ग वादनात आपली संपूर्ण शक्‍ती झोकून देताना दिसत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ढोल-ताशा पथकामध्ये सराव करीत आहे. कॉलेजवरुन परतल्यावर घरकाम आणि अभ्यास लवकर आटोपून सरावाच्या ठिकाणी आम्ही पोहचतो. ढोल-ताशा वादनाची मला खूप आवड आहे, त्यामुळेच मी पथकामध्ये सहभागी झाले आहे. माझ्या कुटुंबीयांचा देखील पाठिंबा आहे. अनेकदा तरुणींचे पालक देखील मोठ्या आनंदाने व कौतुकाने आपल्या मुलींचा सराव पाहण्यासाठी येतात. माझ्या सारख्या खूप मुली गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सराव करीत आहेत. मुली सायंकाळी सात ते नऊ पर्यंत, तर मुले रात्री दहा वाजेपर्यंत सराव करतात. खूप आनंद आणि उत्साह आहे, तसेच सराव देखील खूपच जोरात सुरू आहे. आम्ही वर्षभर याच उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो.
– श्रावणी मोरे, ढोल-ताशा पथकातील सदस्य.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)