बाप्पांचे स्वागत अन्‌ ते देखील गायनातून!

गायिका कार्तिकी गायकवाड : पारितोषिकांचे गणरायापुढे पूजन

पिंपरी – तू सुखकर्ता तू दुख:हर्ता… तूच कर्ता आणि करविता…मोरया…मोरया…असे गीत गात गायिका कार्तिकी गायकवाड व कुटुंबीयांनी बाप्पाचे स्वागत संगीतातून केले. विशेष म्हणजे संगीतातून मिळालेल्या पारितोषिकांचे कार्तिकीने गणरायापुढे पूजन केले.

कार्तिकीच्या जन्मापासूनच घराण्यात गणपती बाप्पाचे आगमन उत्साहात केले जाते. वडील प्रसिध्द संगीतकार कल्याण गायकवाड, आई सुनीता व भाऊ कौस्तुभ गायकवाड यांच्याकडून गायनाचे धडे मिळून कार्तिकीने गायनात उंच भरारी घेतली. कलेचा वारसा लाभेल्या घराण्यात संगीतातूनच पुढे करिअर करण्याचे स्वप्न कार्तिकीने उराशी बाळगले आहे. कार्तिकीच्या घरी बारा दिवस बाप्पा विराजमान आहेत. जवळपास आळंदी व पुणे परिसरात गायकवाड कुटुंबियाने विविध कार्यक्रमात हजेरी लावली. तसेच मानाचा गणपती कसबा गणपती येथे देखील कार्तिकीने गायनातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. दगडूशेठ गणपतीच्या रौप्य महोत्सवात देखील 125 कलाकारांमध्ये कार्तिकीचा समावेश होता. त्यामुळे गणेशोत्सवात कार्तिकीच्या घरात आनंद व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या गणेशोत्सवात कार्तिकीने अथर्वशीर्ष व पठणाच्या माध्यमातून सुरूवात केली आहे. तसेच भजन, कीर्तनाचा रियाज रोज बाप्पांच्या समोर सुरू आहे.

कार्तिकी व तिच्या वडिलांचा “स्वरानुभूती’ अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहे. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या अभंगाचा व समाजातील गायक घराण्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक संताची रचना यामध्ये आहे. सध्या कार्तिकी पुणे विद्यापीठातून तिसऱ्या वर्षाला संगीताचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे संगीतातून पदवी मिळून मोठे होण्याचे तिचे स्वप्न आहे. अभ्यासाबरोबर तिचा सध्या रोज रियाज देखील सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)