बाप्पांचा प्रसाद खा, पण जरा जपूनच!

एफडीएची कारवाई : साडेबारा हजार किलो भेसळयुक्‍त खवा जप्त

पुणे – तुम्ही खात असलेला खव्याचा मोदक हा चांगल्या खव्याचा आहे ना, याची खात्री करुन मगच तो खा. कारण अन्न व औषध प्रशासनाने महिनाभरात केलेल्या दोन मोठ्या कारवायांमध्ये तब्बल 12 हजार 656 किलोचा खवा जप्त करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. गुजरातवरुन आलेला हा खवा पोत्यांमध्ये भरुन ट्रॅव्हल्समधून आला होता.

सणासुदीचे दिवस आले, की मिठाईसाठी खव्याची मोठ्या प्रमणात गरज भासते. त्यामुळे अशा वेळी अनेकदा परराज्यातून खवा मागविला जातो. मात्र हा खवा अनेकदा निकृष्ट दर्जाचा असणे, त्याची साठवणूक नीट न करणे, वाहतूकीदरम्यान स्वच्छता न बाळगणे आदी प्रकार होतात. सध्या मोदकाच्या प्रसादासाठीचा खवा हा मोठ्या प्रमणात गुजरातवरुन मागविण्यात आला. मात्र यातील बहुतांश खवा हा अस्वच्छ असल्याचे प्रशासनाच्या पहाणीतून पुढे आले आहे.

याबाबत माहिती देताना अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्‍त संजये शिंदे म्हणाले, “गेल्या महिनाभरात खव्याबाबत दोन मोठ्या कारवाया झाल्या. पहिली कारवाई ही 15 ऑगस्ट रोजी झाली. त्यामध्ये गुजरातवरुन आणलेला 15 लाख 60 हजार 792 रुपयांचा 8 हजार 800 किलो खवा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी लगेचच ओल्या कचऱ्यात त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. तर दुसरी कारवाई ही देखील गुजरात वरुन आलेल्या खव्यावर झाली. 8 सप्टेंबर रोजी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांमधून आलेला 3 हजार 856 किलोचा खवा जप्त करण्यात आला.’ ही कारवाई सहायक आयुक्‍त एस. पी. शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी आर. बी. कुलकर्णी, प्रशांत गुंजाळ, स्वाती मस्के आदींनी केली.

खव्याची अस्वच्छ वाहतूक
कारवाईदरम्यान पकडण्यात आलेला खवा हा गुजरातवरुन ट्रॅव्हल्समधून आला होता. ही खव्याची पोती पॅसेंजर सीट खाली कशीही टाकलेली होती. तसेच खवा हा स्वच्छ व थंड जागी ठेवणे गरजेचे आहे. मात्र, गुजरातवरुन आणलेला हा खवा जवळपास 18 ते 24 तास आधी गाडीत टाकला होता. त्यामुळेच अशा खव्यात बॅक्‍टेरिया होण्याची शक्‍यता असल्याने तो खवा नष्ट करण्यात आला.

गणेश मंडळांच्या महाप्रसादाबाबतही सूचना
गणेशोत्सव काळात अनेक गणेश मंडळे महाप्रसादाचे आयोजन करतात. अशा वेळी स्वच्छता न पाळणे, चुकीचे अन्नपदार्थ वापरणे आदींमुळे विषबाधा होण्याची शक्‍यता असते. त्यामुळेच प्रशासनाकडून गणेश मंडळांना सूचना दिल्या जातात तसेच सूचना फलकांचे वाटप केले जाते. तसेच या प्रसादाची अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी करतात, अशी माहिती सहायक आयुक्‍त एस. एम. देशमुख यांनी दिली.

सध्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या 25 अधिकाऱ्यांमार्फत मिठाई तसेच अन्य अन्नपदार्थ तपासणीची मोहीम सुरू आहे. दिवाळी संपेपर्यंत ही तपासणी अशीच सुरू राहिल. नागरिकांनी मिठाई खरेदी करताना सावधानता बाळगावी. काही तक्रार असल्याच एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
– संजय शिंदे, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)