बाद 500 आणि 1000 च्या 99 टक्के नोटा बॅंकांमध्ये जमा – आरबीआय

मुंबई- नोटबंदीनंतर चलनातून बाद केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या 99 टक्के नोटा पुन्हा बॅंकांमध्ये जमा झाल्याचे आज रिझर्व बॅंकेने सांगितले. त्यामुळे काळ्या पैसा आणि भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाच्या प्रभावावरच विरोधकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

गेल्यावर्षी 8 नोव्हेंबरला झालेल्या नोटबंदीनंतर नक्की किती बाद नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यात आल्या, याचा तपशील रिझर्व बॅंकेकडून आतापर्यंत दिला जात नव्हता. मात्र 2016-17 च्या वार्षिक अहवालामध्ये आरबीआयने याबाबतची माहिती दिली आहे. एकूण 15.28 लाख कोटी रुपयांच्या बाद नोटां पुन्हा बॅंकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. आता केवळ 16,050 कोटी रुपयांच्या बाद नोटा जमा झालेल्या नाहीत, असे “आरबीआय’ने म्हटले आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 रुपयांच्या 1,716.5 कोटी आणि 1000 रुपयांच्या 685.8 कोटी (15.44 लाख कोटी रुपये किंमतीच्या) नोटा चलनामध्ये होत्या. नोटबंदीनंतर 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईवर “आरबीआय’ने 7,965 कोटी रुपये खर्च केले. वर्षभरापूर्वी नोटांच्या छपाईसाठी 3,421 कोटी रुपये खर्च झाले होते. याचा अर्थ नोटबंदीनंतर छापलेल्या नोटांसाठी दुपटीने खर्च झाला होता. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले गेले होते. मात्र “आरबीआय’ने घेतलेल्या नमुना पहाणीमध्ये 500 रुपयांच्या 10 लाख नोटांमध्ये केवळ 7.1 आणि 1000 रुपयांच्या 10 लाख नोटांमध्ये 19.1 नोटा सापडल्याचे निदर्शनास आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)