‘बादशाहो’ मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

मुंबई : अजय देवगन, इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या ‘बादशाहो’ चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. ‘दीवार’मधले गाणे वापरायचे असेल, तर ‘बादशाहो’ प्रदर्शित करता येणार नाही, असे अल्टिमेटम मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना दिले आहे.
1975 साली प्रदर्शित झालेल्या ‘दीवार’ चित्रपटातील ‘कह दू तुम्हे’ गाणं ‘बादशाहो’त वापरल्यामुळे दीवारच्या निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ‘कह दू तुम्हे’ गाणं वापरल्यास ‘बादशाहो’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचे आदेश गेल्या आठवड्यात खंडपीठाने दिले होते. त्याविरोधात बादशाहोच्या निर्मात्यांनी केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. ‘कह दू तुम्हे, या चूप रहू, दिल में मेरे आज क्या है’ या गाण्याच्या संगीत आणि गीताच्या कॉपीराईट्सवरुन दीवारच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं साहिर लुधियानवी यांनी लिहिलं होतं. आरडी बर्मन यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. अमिताभ बच्चन, शशी कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
‘बादशाहो’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा ‘दीवार’चे निर्माते त्रिमूर्ती फिल्म्स यांनी 22 ऑगस्ट रोजी केला होता. ‘कह दू तुम्हे’ गाणं वापरल्यास ‘बादशाहो’ चित्रपटाचं प्रदर्शन थांबवा, मात्र ते गाणं वगळल्यास रिलीजला कोणतीही आडकाठी नसल्याचं जस्टिस के आर श्रीराम यांनी स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)