बाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग 1)

बाटलीबंद पाणी ही काही वर्षांपूर्वीपर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू वर्गासाठीची मानली जाणारी बाब अगदी सर्वसामान्यांसाठीही “जीवनावश्‍यक’ कशी बनली हे कळलेच नाही. वाढत चाललेल्या जलप्रदूषणामुळे आजारपण वाढत गेली आणि त्यातूनच बाटलीबंद पाणी “अपरिहार्य’ बनले. मात्र, न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनात 90 टक्‍के बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे कण असल्याचे म्हटले आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विकणाऱ्या या कंपन्या बाटल्या बनविण्यासाठी पॅथेलेट्‌स, बीपीए आणि अँटिमनी यांसारख्या घातक रसायनांचा वापर करतात. त्याचा आपल्या पचनशक्‍तीवर आणि प्रजननशक्‍तीवरही प्रतिकूल परिणाम होतो.

बाटलीबंद पाण्याचा इतिहास

बाटलीबंद पाणी सध्या बरेच लोकप्रिय असले तरी त्याचा इतिहास 1845 पासून सुरू होतो. त्यावेळी पोलंड स्प्रिंग बोटल्ड वॉटर नावाच्या कंपनीने पोलंडमध्ये बाटलीबंद पाण्याचे संयंत्र प्रथम तयार केले होते. त्यावेळी या कंपनीचा व्यवसाय काही हजार डॉलरपुरताच मर्यादित होता. आज बाटलीबंद पाण्याच्या विक्रीच्या बाबतीत जगात पाचव्या स्थानावर असणाऱ्या भारतात या व्यवसायाची सुरुवात 1965 मध्ये झाली. त्यावेळी बिसलेरी या इटलीच्या कंपनीने मुंबईत बोटलिंग प्लान्ट सुरू केला. सध्या भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या शंभराहून अधिक कंपन्या असून, त्यांचे 1200 बोटलिंग प्लान्ट आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक शहरात कुटिरोद्योगाच्या स्वरूपात हा व्यवसाय सुरू असून, प्रत्येक शहरामागे चार-दोन छोट्या-छोट्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यांचे बोटलिंग प्लान्ट विचारात घेतल्यास प्लान्टची एकूण संख्या दहा हजारांपेक्षा अधिक होते. जगभरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय चाळीस टक्‍के दराने वाढला आहे. आजमितीस पाण्याचा जगभरातील व्यापार 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. यातील एकट्या भारताचा हिस्सा 14.85 अब्ज डॉलर इतका आहे. हा आकडा देशभरात विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या केवळ 15 टक्‍के आहे. अहमदाबादच्या कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटीने तपासणी करून काढलेल्या निष्कर्षानुसार, बाजारपेठेतून डोळे झाकून कोणत्याही बाटल्या खरेदी केल्या आणि त्यांची तपासणी केली तर 13 पैकी 10 बाटल्यांमधील पाण्यात अनावश्‍यक घटक तरंगताना दिसतात. म्हणजेच, तपासणीसाठी आणलेले 76.9 टक्‍के पाणी पिण्यास अयोग्य असते.

संबंधित वृत्त – बाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग २)

पाणी म्हणजे अमृत असे म्हटले जाते आणि खरेही आहे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी हा सर्वांचाच अधिकार आहे. मात्र, गेल्या काही दशकांपासून वाढणारे प्रदूषण आणि बेफिकीर मानवीवृत्तीमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती संकटात सापडली आहेत. त्यापासून पाणीही कसे अपवाद राहील. शुद्ध आणि स्वच्छ पाणी सोडाच पाहणेदेखील दुर्मिळ झाले आहे. अशा स्थितीत शुद्ध पाण्याच्या शोधात असलेल्या नागरिकांनी बाटलीतील सीलबंद पाण्याचा आधार घेतला. मग खेडोपाडी, बसस्थानकापासून ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बाटलीतीलच पाणी पिण्यात येऊ लागले. अस्वच्छ पाणी नको म्हणून सीलबंद पाण्याचा आग्रह केला जाऊ लागला. मात्र, आता हेच पाणी मानवाच्या मुळावर उठले आहे. सीलबंद पाण्यात प्लॅस्टिकचे बारीक कण असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने हे पाणी शरीराला अपायकारक असल्याचे संशोधक सांगत आहेत. एवढे असूनही सीलबंद बाटलीतूनच पाणी पिण्याचे वेड कमी झालेले नाही.

बाटलीबंद पाणी याची उपलब्धता आणि प्रवासात बाळगणे जेवढे सोपे आहे, तेवढेच आरोग्यासाठी हानिकारक आहे. जगभरात बाटलीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत सांशकता व्यक्‍त केली जात आहे. यासंदर्भात वेळोवेळी धक्‍कादायक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यंदाचा खुलासा मात्र हादरून टाकणारा आहे. न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले की, बाटलीतील 90 टक्‍के पाणी हे पिण्यासारखे नसते. त्यात प्लॅस्टिकचे बारीक कण मिसळलेले असतात. यात जगभरातील 11 नामवंत ब्रॅंडचा समावेश आहेत. यात भारतातील काही प्रतिष्ठित कंपन्यांचा देखील समावेश आहे. हे नमुने दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकत्तासह जगभरातील 19 शहरांतून घेण्यात आले होते. या बाटलीत एक लिटरच्या पाण्यात 10.4 मायक्रो प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. हे पाणी नळातून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत दुप्पट खराब आहे. प्लॅस्टिकच्या अवशेषात पॉलीप्रोपाइलिन, नायलॉन आणि पॉलिइथिलीन, टेरेपथालेटचा समावेश आहे. त्याचा वापर बाटलीचे झाकण तयार करताना होतो. बाटलीत पाणी भरताना प्लॅस्टिकचे कण पाण्यात मिसळतात आणि ते नकळतपणे आपल्या पोटात जातात. जाहिरातीतून बाटलीबंद पाणी हे सामान्य पाण्यापेक्षा अधिक आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. मात्र, संशोधनातून हे पाणी हानिकारक असल्याचे दिसून येते. भारतात विविध ब्रॅंडमार्फत जे बाटलीबंद पाणी विकले जाते, ते शरीरासाठी हानिकारक आहे. त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापरदेखील होते. भारतातील अध्ययनाशिवाय आंतरराष्ट्रीय संस्थांनी यासंदर्भात जो अभ्यास केला आहे, त्यावरून बाटलीतील पाणी शरीराला पोषक नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. बाटलीतील पाणी हे प्लॅस्टिकच्या तुकड्यांशिवाय बॅक्‍टेरियाचा देखील आधार ठरत आहे. कारण नदी आणि जमिनीतील पाणी दूषित झाले आहे. या नैसर्गिक स्रोताच्या शुद्धीकरणासाठी ठोस उपाय केले जात नाही. असे असतानाही बाटलीबंद पाण्याचा उद्योग विस्तारतच आहे.

 

सूर्यकांत पाठक
कार्याध्यक्ष अ.भा.ग्राहक पंचायत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)