बाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग २)

बाटलीबंद पाणी ही काही वर्षांपूर्वीपर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू वर्गासाठीची मानली जाणारी बाब अगदी सर्वसामान्यांसाठीही “जीवनावश्‍यक’ कशी बनली हे कळलेच नाही. वाढत चाललेल्या जलप्रदूषणामुळे आजारपण वाढत गेली आणि त्यातूनच बाटलीबंद पाणी “अपरिहार्य’ बनले. मात्र, न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनात 90 टक्‍के बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे कण असल्याचे म्हटले आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विकणाऱ्या या कंपन्या बाटल्या बनविण्यासाठी पॅथेलेट्‌स, बीपीए आणि अँटिमनी यांसारख्या घातक रसायनांचा वापर करतात. त्याचा आपल्या पचनशक्‍तीवर आणि प्रजननशक्‍तीवरही प्रतिकूल परिणाम होतो.

नफ्यासाठी आरोग्याशी खेळ

या व्यवसायातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यावर एक नजर टाकू या. सरासरी 15 ते 20 रुपये प्रतिबाटली दराने पाणी विकणाऱ्या कंपन्या एक बाटली पाण्यामागे केवळ तीस पैसे सरासरी खर्च करते. म्हणजेच एक व्यापार म्हणून बाटलीबंद पाण्याइतका फायदेशीर व्यवसाय दुसरा कोणताच नाही. आता प्रश्‍न एवढाच की बाटलीबंद पाणी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खरोखरच योग्य आहे का? तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी कितीही दावे केले तरी बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेची खात्री देता येत नाही. अमेरिकेसारख्या देशात कडक नियमावली असूनसुद्धा तब्बल 38 टक्‍के बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे दिसून आले आहे. या निष्कर्षावरून भारतात काय परिस्थिती असेल, याचा अंदाज लावणे अवघड नाही. भारतातील बाटलीबंद पाण्याची शुद्धता किती आहे, हे आणखी एका घटकावरून समजून घेणे शक्‍य आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाने पाण्याच्या गुणवत्तेविषयी 122 देशांच्या केलेल्या सर्वेक्षणात आपल्या देशाचा 120 वा क्रमांक लागला आहे. नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल ऑफ अमेरिका यांसारख्या संस्थांच्या अहवालावर नजर टाकली असता असे दिसून येते की, मिनरल वॉटरच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विकणाऱ्या या कंपन्या बाटल्या बनविण्यासाठी पॅथेलेट्‌स, अँटिमनी यांसारख्या घातक रसायनांचा वापर करतात. त्याचा आपल्या पचनशक्‍तीवर आणि प्रजननशक्‍तीवरही प्रतिकूल परिणाम होतो. बाटलीबंद पाण्याचे जितके प्लान्ट भारतात आहेत, त्यातील बहुतांश प्लान्टमध्ये पाण्याच्या शुद्धतेची चाचणी करण्यासाठी ना प्रयोगशाळा आहे ना केमिस्ट. यावरूनच कंपन्यांच्या शुद्धतेच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे लक्षात येते. पाण्याची स्वच्छता आणि शुद्धता याबाबत कंपन्या कितीही दावा करोत; परंतु हे पाणी आरोग्यासाठी चांगले कदापि मानता येत नाही. भारतात नामांकित आणि संघटित क्षेत्रातील बाटलीबंद पाणीव्यापार एकूण उलाढालीच्या केवळ 40 टक्‍के आहे. उर्वरित 60 टक्‍के बाटलीबंद पाणी फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या, दुय्यम दर्जाच्या कंपन्यांकडून उत्पादित केले जाते. पाण्यासारख्या क्षेत्रात असंघटित उद्योग तब्बल 60 टक्‍के असणे अत्यंत घातक आहे.

संबंधित वृत्त – बाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग 1)

पर्यावरणासाठीही घातकच?

पर्यावरणाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. एक बाटली पाणी बनविताना पाच लिटर पाण्याचा अपव्यय होतो असे लक्षात आले आहे. अशा स्थितीत आपल्या देशातील भूगर्भातील पाणीसाठे संपत चालल्याचे प्रमुख कारण बाटलीबंद पाण्याचे प्लान्टच आहेत, असे म्हणावे का? देशभर पडत असलेल्या दुष्काळाचे एक प्रमुख कारण म्हणून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय समोर येतो आहे. पाणी बाटलीबंद करण्याच्या प्रक्रियेत सहा किलोग्रॅम कार्बनडाय ऑक्‍साइडचे उत्सर्जन होते. याखेरीज अत्यंत निकृष्ट दर्जाच्या प्लॅस्टिकपासून बनविलेल्या बाटल्या पोटात गेल्याने दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्राण्यांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ, बाटलीबंद पाणी विकून कंपन्यांची जी नफेखोरी चालली आहे, त्याचा भुर्दंड नागरिकांना चुकता करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगाच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा आज थेंब-थेंब पाण्यासाठी भटकताना दिसतो आहे. अशा स्थितीत पाणीव्यवस्थापनाकडे भारतासारख्या देशांत लक्ष दिले गेले नाही तर भविष्यात देशातील 70 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकसंख्येपुढे अतिशय गंभीर पेचप्रसंग उभा राहू शकतो. एकंदरीत बाटलीबंद पाणी ना आरोग्यासाठी हितकारक आहे ना पर्यावरणास पूरक.
आपण ज्या देशांकडून औद्योगिकरणाची नीती अवलंबली आहे, त्यांच्याकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन कसे करावे, हे मात्र शिकलो नाहीत. परदेशात आपल्या तुलनेत तलाव, नद्या अधिक स्वच्छ आहेत. स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, त्याचे संरक्षण करण्याऐवजी पाण्याकडे उद्योग म्हणून पाहिले जात आहेत आणि ही बाब दुर्दैवी आहे.

सूर्यकांत पाठक
कार्याध्यक्ष अ.भा.ग्राहक पंचायत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)