बाजार समित्यांना निवडणुकांचा खर्च द्यावा लागणार आहे. निवडणुका जाहीर झालेल्या 51 पैकी 12 समित्यांनी निधी नसल्यामुळे निवडणुका घेता येणार नसल्याचे पत्र दिले आहे. तरी याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतला नाही.
– मधुकर चौधरी, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण
निधी नाही : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पत्र
पुणे – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी अनेक बाजार समित्यांनी निवडणूकांसाठी आवश्यक असणारा निधी नसल्याने निवडणुका घेणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत राज्यातील 12 समित्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पत्र देवून निवडणुकांसाठी असमर्थता दर्शविली आहे.
राज्यातील अनेक बाजार समित्यांचा कारभार हा सध्या प्रशासकांमार्फत चालत आहे तर काही ठिकाणी जुने संचालक मंडळ काम करत आहे. त्यामुळे कार्यकाल संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणूका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. निवडणूका जाहीर झाल्यावर या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च हा समितीला करावा लागतो. त्यामध्ये निवडणूक साहित्य खरेदी, नेमलेल्या व्यक्तींचे मानधन असे प्रमुख खर्च असतात. यासाठी बाजार समितीकडे निधी असावा लागतो. पण, हाच निधी नसल्याने निवडणुका घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळेच 12 समित्यांनी निवडणुका घेणे अशक्य असल्याचे पत्र प्राधिकरणाला दिले आहेत.
राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणूक नियमावलीत बदल केला आहे. आता दहा गुंठे जमीन असलेले शेतकरी हे मतदार असणार आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या ही पूर्वीच्या तुलनेत जास्त असणार आहे. काही बाजार समित्यांचे बाजारक्षेत्र मोठे असल्याने त्या ठिकाणी ‘मिनी विधानसभा’प्रमाणे निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांसाठी खर्च जास्त होणार आहे. त्यासाठी समित्यांकडे निधी असणे अत्यावश्यक आहे. या निवडणुका घेण्याची जबाबदारी प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. सध्या पुण्यासह सोलापूर आणि नाशिक या बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील बाजार समितीच्या मतदारांची प्राथमिक यादी तयार झाली आहे.
या समित्यांची असमर्थता
निधी नसल्याने निवडणुकांसाठी असर्मथता दर्शविणाऱ्या या बारा समित्यांमध्ये पाच समित्या या नागपूर विभागातील आहेत. तर उर्वरित समित्यामध्ये करमाळा, सोलापूर,परांडा, उस्मानाबाद-मातोळा, बुलडाणा सिंदखेडराजा, बुलडाणा, दारव्हा-यवतमाळ ,बोरीअरब यवतमाळ, गोंदिया यांचा समावेश आहे. त्यामुळे आता समित्याच्या निवडणुका होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा