बाजार समिती कर्मचाऱ्यांचा लवकरच शासकीय सेवेत समावेश

श्रीगोंदा – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठीच्या अभ्यासासाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समितीची स्थापन करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. या समितीने अभ्यास करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने समितीला दिल्या आहेत.

बाजार समिती कर्मचारी संघाच्या पुणे येथे 18 डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे याबाबत मागणी केलेली होती. देशमुख यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन मेळाव्यात दिले होते. इतर राज्यांमध्ये बाजार समितीचे कर्मचारी राज्य शासनाच्या आस्थापनेवर आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार का, यावर समिती अभ्यास करणार आहे. कर्मचाऱ्यांना शासनाच्या आस्थापनेवर घेतल्यास त्यांनी बदल्याची तयारी ठेवावी, असे मंत्री देशमुख यांनी मेळाव्यात स्पष्ट केले होते.
दरम्यान, राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये सुमारे 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये स्थैर्य निर्माण होणार असून संघटनेची गेली 15 ते 20 वर्षांपूर्वीची असणारी मागणी मंजूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. बाजार समितीचे कामकाज करताना कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील राहतील व बाजार समित्याही सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्‍वास कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेबरे यांनी व्यक्‍त केला.

अशी असेल समिती…

अध्यक्ष – सुनील पवार (कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे), सदस्य – डॉ. किशोर तोष्णीवाल (साखर संचालक, प्रशासन), दिलीप डेबरे (अध्यक्ष, बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे), अरविंद जगताप (बाजार समिती कर्मचारी प्रतिनिधी, पुणे विभाग), बालाजी भोसीकर (बाजार समिती कर्मचारी प्रतिनिधी, मराठवाडा विभाग), अंकुश झंझाळ (बाजार समिती कर्मचारी प्रतिनिधी, विदर्भ विभाग), सदस्य सचिव – प्रशांत सोनवणे (जिल्हा उपनिबंधक, मुंबई).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)