बाजार समितीमधील अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम थांबवा

नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुले, फळे व भाजी विक्रीसाठी असलेल्या शेडच्या जागेत बाजार समितीकडून अनधिकृतपणे छोट्या-छोट्या गाळ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे फुले व भाजीविक्रेत्यांना शेडच्या बाहेर बसावे लागत आहे. हे अनधिकृत बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

याबाबत सातपुते यांनी जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांना निवेदन दिले आहे. बाजार समितीमध्ये तालुक्‍यासह जिल्ह्यातील आजूबाजूचे शेतकरी फळे, फुले व भाजी विक्रीसाठी आणतात. बाजार समितीमधील शेड असलेली जागा शेतकऱ्यांचा माल उतरविण्यासाठी व विक्री करण्यासाठी वापरात होती. पावसामुळे, उन्हामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने अनुदान देऊन येथे मोठे शेड उभारले होते. मात्र, नुकतेच बाजार समितीच्या संचालक मंडळाने या शेडमधील छोटे-छोटे भाग पाडून जवळपास 30 गाळे उभारण्याचे काम चालू केले आहे.

या गाळ्यांच्या बांधकामांमुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागणार आहे. पावसामुळे त्यांच्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. बाजार समितीचे संचालक या गाळ्यांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्याचीही शक्‍यता आहे. तरी या प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांची हक्काची जागा त्वरित मोकळी करून द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह आंदोलन करू. प्रशासनाने दखल घेतली नाही तर शिवसैनिक सर्व गाळे पाडून टाकतील, असा इशाराही सातपुते यांनी दिला आहे.

यावेळी विजय पटारे, अजय अजबे, अमोल येवले, प्रमोद ठुबे, भाऊ कांडेकर, रावजी नांगरे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)