बाजारावर सिताफळही रुसले

पाऊस कमी : गतवर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक


घाऊक बाजारात भाव 20 ते 200 रु/ किलो

पुणे – पावसाने पाठ फिरविल्याचा फटका सिताफळाला बसला असून उत्पादन घटले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात आवकही घटली आहे. सध्या बाजारात दररोज 8 ते 10 टन माल बाजारात दाखल होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक निम्म्याहून कमी आहे. परिणामी, घाऊक बाजारात सिताफळाला जास्त भाव मिळत आहे. दर्जानुसार किलोस 20 ते 200 भाव मिळत आहे.

सिताफळांची सासवड, बारामती, खेड, चाकण, सातारा, मंडर, लोणी, फुरसुंगी, उरळी कांचन, यवत, पाटस आदी जिल्ह्याच्या विविध भागांतून मार्केटयार्डात आवक होत आहे. तर, औरंगाबाद, जालना, नगर, पारनेर, बीड, कोल्हापूर येथून आवक होते. सध्या सिताफळाचा पहिला बहार संपला असून दुसऱ्या बहारातील सिताफळ दाखल होत आहेत. मात्र, दुसऱ्या बहारात नेहमीच्या तुलनेत 20 ते 30 टक्केच माल बाजारात दाखल होत आहे. हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास सिताफळाचे भाव उतरण्याची शक्‍यता कमी आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विपरित परिणाम होत आहे. पाऊस न झाल्यास सिताफळाला बुरशीची लागण होण्याची शक्‍यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे चांगला माल असेल, त्यांना चांगले भाव मिळतील. मात्र, उत्पादन कमी झाल्याने एकप्रकारे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यताआहे.

यंदा सिताफळाच्या पहिल्या बहाराची अपेक्षित आवक झालेली नाही. आता दुसऱ्या बहाराची आवक सुरू झाली आहे. अपेक्षित आवक होत नाही. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने त्यांचे भाव वाढले आहे. एक किलो सिताफळाचा भाव 20 ते 200 रुपयांपर्यंत आहे. गेल्या वर्षी हाच भाव 10 ते 125 रुपये होता.
– युवराज काची, फळांचे व्यापारी

-Ads-

 

अपेक्षित पाऊस न झाल्याने पावसाळी बहाराचे उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. दसऱ्यानंतर पावसाळी बहाराचा माल सुरू होईल. मात्र, सध्या सिताफळाची अपेक्षित वाढ झालेली नाही. गेल्या वर्षीच्या उन्हाळी बहारातून 5 एकरांतून 5 ते 6 लाखांचे उत्पन्न हाती आले. यंदा 2 लाख रुपये मिळाले. यावर्षी उन्हाळी हंगामातून अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. दरम्यान, पावसाची हिच परिस्थिती कायम राहिल्यास नुकसानाची शक्‍यता आहे.
– संभाजी गायकवाड, शेतकरी, वडकी.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)