बाजाराला हुडहुडी का भरली आहे? (भाग-१)

२० ऑगस्टच्या लेखात निफ्टी ५० चे पुढील उद्दिष्ट हे ११७०० वर्तवलं गेलं होतं, ज्यावेळेस निफ्टी ही ११४७० च्या पातळीवर होती. नंतर २८ ऑगस्ट रोजी निफ्टी ५० नं ११७६०.२० हा सर्वोच्च उच्चांक नोंदवला व तेथूनच निफ्टीचा उतरता कल चालू झाला. याचं प्रमुख कारण म्हणजे १४ ऑगस्ट नंतर अमेरिकी डॉलर समोर घसरलेला रुपया हे होतंच, परंतु पुढील दिवसांत देखील वाढलेल्या डॉलरनं ७० रुपया प्रति डॉलर भावाच्या खाली येण्यास दाखवलेली असमर्थता. आणि हेच प्रमुख कारण आपल्या बाजारात करेक्शन येण्यासाठी कारणीभूत ठरलं. १० ऑगस्टरोजी ६८.५ वरती असलेला डॉलरचा भाव पुढील महिन्याभरात जवळजवळ ७३ ला पोहोचला आणि बाजाराला ग्रहण लागलं.

नंतर, मागील वर्षी नोव्हेंबरमधे भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक करणाऱ्या मूडी या संस्थेच्या गुंतवणूकदार सेवा अहवालानं हे ठळकपणे नमूद केलं की  वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती व लघु कालावधीसाठी असलेला आर्थिक दबाव यामुळं भारताची आर्थिक तूट (फिस्कल डेफिसिट) या आर्थिक वर्षात आपल्या जीडीपीच्या ३.३% असण्याचे उद्दिष्ट ओलांडण्याचा धोका आहे. त्याचीच री ओढत भारतीय रिजर्व बँकेनं देखील या आर्थिक वर्षात वाढत्या चलनवाढीच्या दबावाबद्दल आपली चिंता व्यक्त केली.

-Ads-

यावर आपल्या अर्थमंत्र्यांनी,  पुढच्या वर्षी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागं टाकून भारत ही जगातील पाचवी महासत्ता बनेल असा दावा करून तात्पुरती मलमपट्टी केली. नंतर, ३१ ऑगस्ट रोजी आलेल्या जीडीपीच्या आकड्यांनी बाजाराचं तात्पुरतं समाधान केलं की आपल्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग मागील तिमाहीत (एप्रिल ते जून) ८.२ % राहिला आहे. परंतु हा आनंद बाजारात फार टिकला नाही व त्याच दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी बाजार पडला.

बाजाराला हुडहुडी का भरली आहे? (भाग-२)

निफ्टी आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा शंभर अंश घसरली (११५८२). घसरलेला रुपया, कच्च्या तेलाच्या सतत वाढत असलेल्या किमती व त्यामुळं संभाव्य भाववाढ याबद्दलचे आडाखे बांधून गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु केला. त्यातच भर म्हणून भारतीय स्टेट बँक या भारतातील सर्वांत मोठ्या सरकारी बँकेनं जाहीर केलं की रुपयाची किंमत या वर्षात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १०% पेक्षा जास्त घसरल्यानं भारतास आपल्या लघुकालावधीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सुमारे ६८,५०० कोटी रुपये जास्तीचे मोजावे लागतील! तसेच अजून आलेल्या एका अहवालानुसार एकूण सरकारी दायित्व हे एप्रिल २०१८ च्या तुलनेत १.८२ लाख कोटी रुपयांनी वाढून जून अखेरीस ७९.८ लाख कोटी रुपये झालेलं आहे.  अशा अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणाऱ्या आणि गुंतवणूकदारांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींमुळं पुढचे दोन दिवस सलग बाजारानं आपटी खाल्ली.   निफ्टी ११५८९ वरून थेट ११२८७ वर येऊन पोहोचली.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)