बाजाराला हुडहुडी का भरली आहे? (भाग-२)

बाजाराला हुडहुडी का भरली आहे? (भाग-१)

देशाची निर्यात ही १९.२१ टक्क्यांनी वाढून २७.८४ बिलियन डॉलरवर गेल्याच्या बातमीमुळं बाजारात थोडं स्थैर्य आलं व रुपयाच्या मूल्यांकनामध्ये तीक्ष्ण घसरण झाल्यामुळं भारताच्या सार्वभौम क्रेडिट प्रोफाइलवर परिणाम होऊ शकत नाही कारण रुपये-प्रशासित सरकारी बाँड आणि मजबूत राखीव परकीय चलन या गोष्टी जोखीम कमी करतात, अशा आशयाच्या आलेल्या अहवालानं बाजारानं पुन्हा एकदा उडी मारली. ३.६९% या ११ महिन्याच्या नीचतम पातळीवर घसरलेला महागाई दर आणि जुलै महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर हा अपेक्षेपेक्षा जास्त (६.६%) आल्यानं बाजारानं उत्साह दाखवला व निफ्टी पुन्हा वाढून १४ सप्टेंबररोजी ११५०० च्या पातळीवर म्हणजे ११५१५ ला बंद झाली.

-Ads-

त्या आठवड्याच्या शेवटी आलेल्या खासगी अहवालानुसार भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाबतीतील मानांकन हे ‘बाय’ वरून ‘होल्ड’ झाल्यानं गुंतवणूकदारांची चिंता वाढवली. त्याच बरोबरीनं रुपयाचा डॉलर समोरील दर,  वाढलेल्या कच्या तेलाच्या किमती याबरोबरीनं चीन, अमेरिका यांच्या दरम्यान ट्रेड वॉर भडकण्याच्या भितीनं आणि इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळं महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळं येणाऱ्या दिवसांत व्याजदार कमी होण्याऐवजी त्यात वाढीची शक्यता नाकारता येऊ शकत नसल्यानं बाजार हा मंदीवाल्यांच्या तावडीत सापडला.

नंतर व्याजदराचं चक्र उलट फिरायला लागल्यानं हाऊसिंग फायनान्स कंपन्या व मायक्रो फायनान्स कंपन्यांची कॉस्ट ऑफ बॉरोइंग साधारणपणे या आर्थिक वर्षात ३० पैशांनी वाढण्याच्या शक्यतेमुळं अशा प्रकारच्या कंपन्यांसाठी ती धोक्याची घंटा होती. यातच भर म्हणून या वेळीचा देशाचा पर्जन्य तुटवडा हा १० टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे अशा बातमीनं पुन्हा बाजारात विक्रीचा दबाव येण्याची शक्यता वाढत होती, त्यातच येस बँकेचे सर्वेसर्वा असलेल्या राणा कपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेल्या मुदतीत रिजर्व बँकेनं कपात केल्यानं शुक्रवारी (२८ सप्टे.) बाजार उघडताच येस बँकेचा शेअर चांगलाच कोसळला.

परंतु आपल्या पंतप्रधानांनी भारतीय अर्थव्यवस्था ही २०२२ पर्यंत आताच्या दुप्पट म्हणजे सुमारे ५ ट्रिलियन डॉलर होण्याची ग्वाही दिल्यानं व उत्पादक(Manufacturing) कंपन्यांना बाहेरून अर्थ उभारणीसाठी रिजर्व बँकेनं थोडी शिथिलता दर्शवल्यानं २१ सप्टेंबर रोजी (२० रोजी सुटी) बाजार उघडताना आशावादी होता. परंतु गैर बँकिंग संस्थांच्या तरलतेबद्दल शंका उत्पन्न झाल्यामुळं व म्युच्युअल फंडांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. या कंपनीचे शेअर्स तातडीनं विकल्यानं बाजारातील परिस्थिती एका झटक्यात बदलली व बाजारात घबराट निर्माण झाली. निफ्टी १०८६६ पर्यंत बुडी मरून १११४३ वर बंद झाली. परंतु बाजारात दिलासा न दिसल्यानं व तरलतेबद्दल साशंकता असल्यानं मागील आठवड्याच्या सुरुवातीस (दि. २४) निफ्टी १०९६७ वर बंद झाली. १९ जुलै नंतर निफ्टी ११००० पातळीखाली बंद होण्याची ही पहिलीच वेळ.

२५ तारखेस मात्र बाजारानं थोडासा दिलासा दिला परंतु तो तात्पुरताच होता हे लगेच दुसऱ्याच दिवशी समजलं व बाजार पुढील तीन दिवस सलग पडला. गेल्या आठवड्यात बाजार बंद होताना, निफ्टीनं २१ सप्टेंबररोजी केलेला तळ पुन्हा एकदा गाठला व १०८५० हा नवीन नीचांक नोंदवला. ३१ ऑगस्ट रोजी सेन्सेक्स होता, ३८६४५ व सप्टेंबर महिन्याच्या शेवटी तो बंद झाला ३६२२७ वरती, म्हणजेच एका महिन्यात निव्वळ २४१८ अंशांची घसरण. निफ्टी देखील या एका महिन्यात ७५० अंशांची (सुमारे साडेसहा टक्के) पडझड नोंदवून महिन्याच्या शेवटी ती १०९३० वरती बंद झाली.

बाजाराचा तळ अथवा शिखर हे कधीच अचूकपणे वर्तवता येऊ शकत नाही परंतु आधीच्या लेखांत सांगितल्याप्रमाणं आपल्याकडे अनेक अभ्यास आहेत जे बाजार पडण्याआधी सूचना देऊ शकतात, जसे की MACD.  त्यानुसार ४ सप्टेंबररोजीच निफ्टी ११५२० असताना निगेटीव्ह क्रॉसओव्हर दिलेला होता. आता, निफ्टी ही ओव्हरसोल्ड परिस्थितीत आल्यासारखी वाटते, त्यामुळं निफ्टीसाठी १०७८० ही लागलीच एक आधार पातळी विचारात घेऊन १११५०-१११८० पर्यंत एक उसळी मिळू शकते. बघुयात प्रत्यक्षात काय होतंय ते !

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)