बाजारभाव न ठरताच गुऱ्हाळांना दिला जातोय ऊस

उरुळी कांचन- सध्या ऊसाचा बाजारभाव दोन हजार रुपये प्रती टन आहे; उरुळी कांचन (ता. हवेली) येथील परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिल्याने शेतकरी बाजारभाव न ठरवतान गुऱ्हांना आपला ऊस देत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मात्र उसाला चांगला भाव मिळाला होता.
उरुळी कांचन, सोरतापवाडी, टिळेकरवाडी (ता. हवेली) आदी परिसरात उसाचे उत्पादन चांगले झाले; पण यशवंत भागातील यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या चार-पाच वर्षांपासून बंद असल्याने ऊस पिकाला उठाव नाही. यावर्षी कारखाना सुरू होण्याची शक्‍यात लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले. हा ऊस बारा ते तेरा महिन्यांचा आहे; पण कारखाना बंद असल्याने कमी बाजारभावाने येथील गुऱ्हाळांना ऊस विकावा लागत असल्याचे सोरतापवाडीचे शेतकरी एकनाथ चोरगे यांनी सांगितले.
उरुळी कांचन येथील गुऱ्हाळ चालक भाऊसाहेब कांचन यांनी याबाबत सांगितले की, उसाचे पीक या भागात झालेल्या पावसाने आणि कॅनॉलला पाणी असल्याने चांगले झाले; पण आता शिल्लक राहिलेला ऊस गुऱ्हाळासाठी घेऊन जा; भावाचे नंतर पाहू’ असे सांगून शेतकरी गुऱ्हाळांना ऊस देत आहेत.
याबाबत टिळेकरवाडी येथील येथील शेतकरी चंद्रकांत टिळेकर आणि कोरेगाव मूळ येथील शेतकरी प्रमोद बोधे यांनी सांगितले की ऊस लागवड करणे ते तोडणीस येईपर्यंत एक एकराला सुमारे 50 हजारांपर्यंत खर्च येतो. मात्र सध्या या उसापासून केवळ 70 ते 80 हजार उत्पन्न मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात खर्च वजा जाता फारसे काही येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)