बाजारभावा अभावी बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत

मंचर- लांडेवाडी-मंचर (ता. आंबेगाव) परिसरात बटाटा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. चांगल्या हवामानामुळे बटाटा उत्पादनात वाढ झाली असली तरी बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात बटाटा लागवड केली जाते. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यात खरीप हंगामात सातगाव पठारावरील पेठ, पारगाव, कारेगाव, भावडी, कोल्हारवाडीसह पठारावरील सर्वच गावात बटाटा लागवड केली जाते. उत्पादित झालेला बटाटा पेप्सी कंपनी खरेदी करते. तालुक्‍याच्या पूर्व भागात दिवाळीच्या कालावधीत शेतकरी मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड करतात. मंचर, घोडेगाव, रांजणी, वळती, अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, शिंगवे, लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी इत्यादी गावांतील शेतकरी बटाट्याबरोबरच कांदा, फ्लॉवर, कोबी, भुईमुग, काकडी, बीट, हिरवी मिरची, गवार, धना, मेथी इत्यादी नगदी पिके घेतात.
मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे; परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. अशा शेतकऱ्यांनी ऑक्‍टोबर महिन्यात बटाटा लागवड केली होती. बटाटा पिकाला चालु हंगामात वातावरण पोषक असल्याने बटाट्याचे उत्पादन सुद्धा चांगले निघत असून 50 किलो बटाटा वाणाला 8 ते 9 कट्टे निघत आहेत. अनेक शेतकरी शेतातच ठोक भावात बटाटा विक्री करीत आहेत. सध्या 10 किलो बटाट्याला 100 ते 110 रुपये बाजारभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)