बाजारपेठेलगतचा कचरा हटवून लावला सूचना फलक

ढेबेवाडी – तळमावले ता. पाटण येथील तळमावले कुंभारगाव रोडच्या बाजूला बाजारपेठेलगत कचराडेपो केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. याबाबत “दैनिक प्रभात’ ने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने तेथील कचरा उचलून तेथे सूचना फलक लावला आहे. त्यामुळे या परिसरात आता स्वच्छता राहण्यास मदत होत आहे.

ढेबेवाडी विभागाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या तळमावले, ता. पाटण येथील तळमावले-कुंभारगाव या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेच्या लगत कचरा डेपो करण्यात आला होता. याठिकाणी संबंधितांकडून शिळे अन्न, प्लॅस्टिक पिशव्या, चिकन सेंटरमधील टाकाऊ भाग, कुजलेला भाजिपाला अशाप्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधींचे वातावरण पसरले होते.

कुंभारगाव खोऱ्यात जाणाऱ्या मुख्य मार्गावरच सुमारे बारा वाड्या-वस्त्यांमधील लोकांची ये-जा सुरु असते. रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर प्रवाशी वाहतुकही मोठ्या प्रमाणात सुरु असते. याच रस्त्यालगत घोटील गावठाण वसले असल्याने या गावाचीही वाहतूक याच रस्त्यावरुन सुरु असते. मात्र या रस्त्यावर हॉटेल व्यवसायिक, दुकानदार, चिकन सेंटरवाले बिनधास्तपणे कचरा फेकत असतात.

या कचऱ्यामध्ये शिळे अन्न, टाकाऊ खाद्य पदार्थ, मांसाचे भाग टाकले जात आहेत. यामुळे याठिकाणी भटक्‍या कुत्र्यांची टोळकी जमा होत असून त्यांचीही मोठी दहशत या रस्त्यावर पहावयास मिळते. कचराडेपो खचाखच भरल्याने हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर येवू लागला होता. त्याचा त्रास या मार्गावरुन जाणाऱ्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीं तसेच नागरिकांना सहन करावा लागत होता. या कुत्र्यांच्या टोळक्‍यांकडून विद्यार्थी तसेच नागरिकांवर हल्ले होण्याचेही प्रकार घडत होते.

वांग-मराठवाडी पुनर्वसित घोटील गावठाणातील नागरिकांना रात्री -अपरात्री या रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. याठिकाणी दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने भितीचे वातावरण नेहमीच दिसते. या कचऱ्याची ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावून दिवाबत्तीची सोय करावी, अशी मागणी नागरीकांमधून होत होती. परंतु त्याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत होते. गत आठवड्यात दैनिक प्रभातने याची दखल घेत यावर आवाज उठवला होता. ताईगडेवाडी ग्रामपंचायतीने त्यावर तात्काळ उपाययोजना करता तेथील संपूर्ण कचरा हटवून तेथे सूचना फलक लावला आहे. त्यामुळे दैनिक प्रभातला नागरिकांनी धन्यवाद दिले.

निर्मल ग्रामपंचायत असलेल्या ताईगडेवाडीने दै. प्रभातच्या वृत्ताची दखल घेत संबंधित ठिकाणचा कचरा उचलला. याठिकाणी ओला कचरा टाकणाऱ्यांना 5 हजार रूपयांचा दंड केला जाईल असा सूचना फलकही तेथे लावण्यात आला आहे. तर कचरा टाकणाऱ्या पकडून देणाऱ्यास 2500 रूपयांचे बक्षीसही जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे बक्षिसाच्या लालसेने तेथे कोणी कचरा टाकतो याकडे सर्वजण लक्ष ठेवून असतात. परिणामी हा परिसर नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
ताईगडेवाडी ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)