बाजारपेठेत ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होते कोंडी

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : वरिष्ठांनी उपाययोजना करण्याची गरज

सातारा – शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मोती चौक ते पाचशे एक पाटी रोडवर ट्रान्सपोर्टच्या अवजड वाहनांमुळे प्रचंड कोंडी होत आहे. कोंडी दूर करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलिसांकडून ही दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून आता वरिष्ठांनीच लक्ष घालून कोंडी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुळत: बाजारपेठेतील रस्ता अरूंद असून दोन्ही बाजूला रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रस्ता अधिक अरूंद झाला आहे. अशा स्थितीत बाजारपेठेत रोज खरेदीसाठी तालुक्‍यामधून हजारो नागरिक येत असतात. त्यामध्ये वाहनाने येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अगोदरच वाहतूक कोंडी होत असताना बाजाररपेठेतील दुकानांना माल देण्यासाठी येणारे टेम्पो व ट्रकमुळे कोंडी अधिक वाढत आहे.

प्रत्येक दुकानासमोर ही वाहने दहा ते पंधरा मिनिटे थांबत थांबत पुढे सरकत असल्यामुळे वाहनधारक ग्राहक तसेच नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. वास्तविक ट्रान्सपोर्ट वाहनांनी रात्रीच्या वेळेत माल उतरविणे अपेक्षित असताना दिवसभराच्या कालावधीत उतरविण्यात येत असल्यामुळे कोंडी निर्माण होत आहे. त्याकडे वाहतूक पोलीस देखील जाणीवपुर्वक दुर्लक्ष करित असून आता वरिष्ठांनीच लक्ष घालून ट्रान्सपोर्टची वाहने केवळ रात्रीच्या वेळेतच शहरात येतील यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

सर्वच रस्त्यांवर परिस्थिती
पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे पर्यायी रस्त्यांवर वाहतूकीचा ताण वाढलेला आहे. त्यामध्ये ट्रान्सपोर्टची वाहने ही शहरातील बाजारपेठेसह, राजपथ, राधिका रोड व कासट मार्केट परिसरात अनेक वेळ थांबल्यामुळे त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिणामी पालिका पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेवून यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)