बाजारपेठा “फुल’ल्या

दीपोत्सव साहित्य खरेदीसाठी पुणेकरांनी साधला रविवारचा मुहूर्त

पुणे – आपल्या सर्वांचे आयुष्य प्रकाशमान करणारा आणि आपल्याला एक पाऊल प्रगतीकडे घेऊन जाणारा सण म्हणून दिवाळीची ओळख आहे. या दीपोत्सवासाठी पुणे शहर आणि उपनगरांतील सर्वच बाजारपेठा फुलल्या असून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या प्रकाशपर्वाच्या स्वागताला आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केल्याचे दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आबालवृद्ध आणि सर्वधर्मियांना एकत्र आणणारा दिवाळीचा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. या सणाच्या स्वागताला रोषणाईच्या साहित्यांनी बाजारपेठ झळाळली आहे. अशा सजलेल्या दुकांनामध्ये तासन्‌तास फिरुन खरेदीची मजा पुणेकर घेत आहेत. दिवाळीपूर्वीचा शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत नागरिकांनी खरेदीला गर्दी केली. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी मंडई परिसर, लक्ष्मी रस्ता, रास्ता पेठ, कसबा पेठ, रविवारपेठ, तुळशीबागेसह उपनगरांतील मॉलसह दुकानांत गर्दी दिसून आली. तर, सराफा बाजारतही चांगली उलाढाल दिसत असून बहुतांश महिला दागिने खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सराफांची दुकाने फुलली आहेत. आभूषणेच नव्हे, तर फराळाचे पदार्थ आणि मिठाई खरेदीसाठीदेखील सर्व दुकाने “हाऊसफुल’ झाली आहेत. एकूणच हे चित्र पाहता यंदाची दिवाळी जोरात होणार असल्याचे चित्र आहे.

लक्ष्मी रस्त्यावर कपडे आणि दागिने, तर मंडई परिसरांत पूजा आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी गर्दी होती. फर्गसन कॉलेज रस्त्यावर “ट्रेंडी’ दागिने घेण्याकडे तरुणाईचा कल होता. यात इमिटेशन ज्वेलरीला जास्त मागणी असल्याचे व्यापारी म्हणाले. दिवाळीसाठी लागणाऱ्या सुशोभनाच्या वस्तू, पणत्या, आकाशकंदिल आदी गोष्टींची खरेदी करताना झुंबड उडाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)