बागायत कपाशी लागवड तंत्रज्ञान (भाग- ४ )

पाणी व्यवस्थापन – कापूस हे प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारे पीक असल्यामुळे उपलब्ध पावसाच्या ओलीवरच हे पिक घेतले जाते. 700 ते 750 मी.मी. पाऊस या पिकासाठी आवश्‍यक आहे. परंतू पाऊस वेळेवर किंवा कमी प्रमाणात पडल्यास पाणी देणे गरजेचे आहे. कपाशीची उगवण, पाते गळणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने संवेदनशील अवस्था आहेत. कपाशी पिकास उगवण ते पाते लागणे या कालावधीत पाण्याची गरज कमी असते. पिक फुलो-यात आल्यावर पाण्याची गरज वाढते व बोंड भरण्याच्या अवस्थेत ती सर्वात जास्त असते. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. तसेच ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते सुध्दा देता येतात. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना दररोज किंवा एक दिवसाआड पाणी द्यावे.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन – बीटी कपाशीमध्ये सुरुवातीला पत्तीचे रुपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. पत्ती व बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनात वाढ झालेली आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकांची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्‍यक आहे. शिवाय बीटी कपाशीमध्ये अन्नद्रव्ये शोषणाचे प्रमाण इतर कपाशीपेक्षा अधिक आहे. खते देतांना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापने या संकल्पनेचा अवलंब करावा. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन म्हणजे माती परीक्षण, सेंद्रिय खते, जिवाणू खते, रासायनिक खते आणि फवारणीची खते यांचा एकत्रितपणे आणि संतुलित वापर यामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता टिकून राहील आणि उत्पादन व गुणवत्ताही चांगली मिळेल.

सेंद्रिय खते – जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांची गरज असते. जमिनीत अन्नद्रव्यांची साठवणूक, वाहतूक, पांढऱ्या मुळांची वाढ आणि उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी सेंद्रिय खतांचा अंतर्भाव अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा आहे. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळ खतांचा वापर करावा. कोरडवाहू कपाशीसाठी एकरी 2 टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळखत उपलब्ध असल्यास 0.5 टन या प्रमाणात वापर करावा. बागायती कपाशीसाठी एकरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळखत 1 टन वापरावे. सेंद्रिय खतांचा वापर मशागतीच्या वेळी करावा.

जिवाणू खते – जैविक खतांचा वापर इतर खतांइतकाच महत्त्वाचा आहे. कपाशीसाठी ऍझोटोबॅक्‍टर व पीएसबी ही जिवाणू खते वापरावीत. ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद जिवाणू जमिनीत स्थिर झालेल्या स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात. वर नमूद केल्याप्रमाणे जिवाणूंची बिजप्रक्रीया केली नसल्यास लागवडीला किंवा एक महिन्याच्या आत ऍझोटोबॅक्‍टर 4 किलो व पीएसबी 4 किलो या प्रमाणात शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून किंवा शेण गोमुत्र स्लरीतून वापर करावा.

रासायनिक खते – रासायनिक खतांचा वापर करताना नत्र, स्फुरद व पालाश हे प्रमुख अन्नद्रव्ये, मॅग्नेशियम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये तर लोह, जस्त व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. माती परीक्षणानुसार खत मात्रेत योग्य ते बदल करणे आवश्‍यक आहे.

दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये – बीटी कपाशीला सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो व गंधक 8 किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीला वापरावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस सल्फेट 8 किलो, झिंक सल्फेट 10 किलो व बोरॉन 2 किलो शेणखतात किंवा गांडूळखतात 8 ते 10 दिवस मुरवून वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परीक्षणानुसार निर्णय घ्यावा.

विद्राव्य खतांचा वापर – कपाशीसाठी अनेक शेतकऱ्यांनी पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. ठिबक सिंचनातून खतांचा वापर करता येतो. फर्टीगेशन तंत्रामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ व रासायनिक खतांच्या मात्रेत 20 ते 25 टक्के बचत होते. विद्राव्य खते आम्लधर्मी असल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात सामू नियंत्रित राहतो व ठिबक सिंचन संचामध्ये क्षार साचत नसल्याने ड्रिपर्स बंद होत नाहीत. खते सर्व झाडांना सारख्या प्रमाणात देणे शक्‍य होते.

विद्राव्य खते देण्याची पद्धत – ठिबक सिंचन यंत्रणेतील सर्व लिकेज प्रथम बंद करावेत. सर्व ड्रिपर्समधून सारख्या प्रमाणात पाणी पडते किंवा नाही याची खात्री करावी. शिफारशीप्रमाणे अथवा माती परीक्षण करून पिकांच्या अवस्थेनुसार खतांची मात्रा ठरवावी. खतांची मात्रा प्रथम 15 ते 20 लिटर बादलीत द्रावण तयार करून ठिबक सिंचन संचात सोडावे. खते देण्यासाठी व्हेंच्युरी किंवा एच.टी.पी. पंपाचा वापर करावा. संच चालविण्याच्या एकुण कालावधीपैकी काही काळ पाणी सोडावे नंतर खतांचे द्रावण ठिबक सिंचन संचात सोडून पाण्याबरोबर द्यावे. खते दिल्यानंतर 10 ते 15 मिनिटे संचातून पुन्हा पाणी सोडावे.

फवारणी खतांचा वापर – जमिनीतून दिलेली अन्नद्रव्ये पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. परिणामी पिकांची कमी वाढ, फुलगळ, फळगळ, रोगांचा प्रादुर्भाव, कमी प्रतिचा माल यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. फवारणी ग्रेडचा वापर करून या समस्या कमी करता येतात. फवारणी ग्रेड्‌समध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांनीयुक्त असल्याने पिकांना संपूर्ण पोषण मिळते. क्षारवट / चोपन जमिनीत उत्पादन अतिशय उपयुक्त, टंचाई काळात पिक वाचून सर्वसाधारण उत्पादन घेणे शक्‍य होते. 1. पिक वाढीसाठी व काळोखीसाठी 18 :18:18 किंवा 19:19:19 एक किलो प्रति एकर 1. पाते लागताना व फुलधारणा 13:40:13 किंवा 00:52:34 किंवा 12:61:00 एक किलो प्रति एकर 2. बोंडे पक्वतेला 13:00:45 किंवा 00:00:50 एक किलो प्रति एकर.

नारायण निबे 

विषय विशेषज्ञ, (कृषिविद्या)

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव- ने ता. शेवगाव 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)