बांधकाम साहित्य जळाले
पुणे – पौड रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालयाजवळ बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग लागली. या आगीत बांधकाम साहित्यासाठी असलेल्या स्टोअररुमधील काही सामान जळून खाक झाले. अग्निशामक दलाने तब्बल तासभर झगडत आगिवर नियंत्रण मिळवले.

एसएनडीटी शेजारी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. यातील 19 मजल्याचे स्लॅप टाकून झाले असून पहिले चार मजले पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यातील दुसऱ्या मजल्यावर सध्या स्टोअर रुम असून त्यामध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी दुपारी अचानक आग लागल्याने मोठा धुर झाला होता. यामध्ये नायलॉनचे रोप, प्लॅस्टीकचे पाईप आदी साहित्य होते. यामुळे प्रचंड धुर आणी उग्र वास येत होता. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र हा दुसरा मजला पूर्णपर्ण पत्र्याने पॅक करण्यात आल्याने जवानांना प्रथम पत्रे तोडून आत प्रवेश करावा लागला. एका बाजूने पाण्याचा मार करुनही आग नियंत्रणात येत नव्हती.

यामुळे दुसऱ्या बाजूचेही पत्रे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूला आरसीसीचा रॅंप होता, त्यावर लोखंडी रॉड ठेऊन जवानांना पाण्याचा मारा करावा लागला. प्लॅस्टीकच्या मोठ्या प्रमाणात वस्तू असल्याने विशेष सूट घालून जवानांना आत प्रवेश करावा लागला. जवानांना 60 ते 70 टक्के सामान वाचवण्यास यश आले. मात्र तब्बल तासभर झगडल्यानंतर आग आटोक्‍यात आली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश दांगट, स्टेशन ऑफिसर गजानन पात्रुडकर तांडे अंगद लिपाणे, जवान अमोल पवार, दिपक पाटील, अतुल गलांडे आदींनी मदतकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)