सदनिकेसाठी घेतलेले पैसे 10.65 टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश

पुणे – करारात ठरल्याप्रमाणे सदनिकेचे पैसे देऊनही घराचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीने (रेरा) दणका दिला आहे. संबंधित ग्राहकाला 2014 पासून 10.65 टक्के व्याजाने पैसे देण्याचा आदेश दिला असून, दाव्याच्या खर्चापोटी 25 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी रुपेश जैन यांनी विश्‍वजित सुभाष झंवर (ज्युवेल टॉवर, कोरेगाव पार्क) यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. जैन यांनी झंवर यांच्याकडून 1 कोटी 22 लाख 65 हजार रुपये किमतीची सदनिका घेण्यासाठी करार केला होता. करारात ठरल्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकास 1 कोटी 13 लाख 63 हजार 800 रुपये दिले होते. तसेच, 5 लाख 95 हजार 900 रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क देखील भरले होते. मात्र, 1 जानेवारी 2014 पासून त्यांना सदनिकाच मिळाली नाही. त्यामुळे जैन यांनी अॅड. सुदीप केंजळकर यांच्यामार्फत “रेरा’कडे याचिका दाखल केली होती.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने 10.65 टक्के दराने 2014 पासून व्याजासह रक्कम ग्राहकाला परत करावी, असा आदेश दिला आहे. तसेच, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दाव्याच्या खर्चापोटी 25 हजार रुपयांची रक्कम ग्राहकाला द्यावी. ही रक्कम 30 दिवसांत ग्राहकाला द्यावी, असा आदेश न्यायाधिकारी एम.व्ही. कुलकर्णी यांनी दिला आहे.

जैन यांना सदनिकेचा वेळेत ताबा न मिळाल्याने दुसरीकडे सदनिका घ्यावी लागली. सदनिकेचा करार 1 कोटी 22 लाख 65 हजार रुपयांचा होता. त्यापैकी 1 कोटी 13 लाख 63 हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे करारात म्हटले होते. मात्र, सदनिकेचा ताबाच मिळाला नाही. ही बाब न्यायालयाने ग्राह्य धरत व्याजासह रक्कम परत देण्याचा आदेश दिला आहे.

– अॅड. केंजळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)