बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा ससूनला फटका  

अंतर्गत सुविधांसाठी शर्थीने मिळवलेला निधी शासनाच्या तिजोरीत जाण्याची शक्‍यता


 गलथान कारभारामुळे निधी परत जाण्याची दुसरी वेळ 

सागर येवले 

पुणे – ससून रुग्णालयाची बहुमजली इमारत थाटात उभी केली. परंतू, अंतर्गत सुविधांसाठी शर्थीने प्रयत्न करून मिळवलेला निधी मात्र पुन्हा शासनाच्या तिजोरीत जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असून, हा निधी पुन्हा गेल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याचा खटाटोप करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकामच्या अशा गलथान कारभारामुळे निधी परत जाण्याची ही दुसरी वेळ आहे.

ससून रुग्णालयातील नवीन इमारतचे अंतर्गत काम लवकर पूर्ण होवून, ती रुग्णांसाठी वापरात यावी. या इमारतीच्या कामासाठी येणारा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खर्च केला जात आहे. सध्या अंतीम टप्प्यात काम आले असून, अशा परिस्थितीत निधी माघारी जाणे चुकीचे आहे. त्यामुळे 15.56 कोटी रुपयांचा निधी परत जावू न देता कामाला गती देणे आवश्‍यक आहे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय

-Ads-

गोर-गरिब आणि मध्यमवर्गीयांच्या हक्काचे रुग्णालय म्हणजे ससून रुग्णालय. मागील काही वर्षांत दानशूर व्यक्तींमुळे रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलेला आहे. सुसज्ज, स्वच्छ आणि अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय अशी ससूनने ओळख निर्माण केली आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि ससून रुग्णालयाची इमारत जुनी असल्यामुळे याच परिसरात नवीन अकरा मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बहुमजली इमारतीच्या कामाला सुरवात झाली.

आठ मजल्यापर्यंत काम पोहोचल्यानंतर निधी अभावी इमारतीची गती संथावली. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, अधिक्षक अजय तावरे, डॉ. हरिष टाटिया, डॉ. इब्राहीम यांच्यासह टीमने वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून इमारतीसाठी निधी आणल्यामुळे अकरा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले.

त्यानंतर इमारतीमधील अंतर्गत सुविधांच्या कामासाठी 109.29 कोटी एवढ्या रक्‍कमेस प्राशासकीय मान्यता मिळाली. त्यानुसार 2016-17 या वित्तीय वर्षामध्ये 62.17 कोटी ऐवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च 2017 अखेरपर्यंत केवळ 42.13 कोटी रुपये खर्च केला. उर्वरीत 20.3 कोटींचा निधी बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे माघारी गेला. हा निधी दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आला. सदरचा निधी 2017-18 या वर्षात वर्ग करून पुन्हा देण्यात येईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले; परंतू अद्याप हा निधी मिळालेला नाही. त्यामुळे ससून प्रशासनाने 2017-18 या आर्थिक वर्षात पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करून 15.56 कोटी निधी मिळविला.

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा निधीही पुन्हा शासनाच्या तिजोरीत जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. निधीची कमरतरा, आलेला निधी माघारी जाणे या कारणांमुळे बहुमजली इमारतीचे काम लांबणीवर पडत आहे. नवीन इमारत कधी पूर्ण होणार, रुग्णांना कधी उपचार मिळणार असे प्रश्‍न नागरिकांकडून विचारले जात आहे. दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेख यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.

निधी परत गेल्यास जबाबदारी तुमची… 
नवीन अकरा मजली इमारतीच्या अंतर्गत सुविधांसाठी 2017-18 मध्ये 15.56 कोटी ऐवढा निधी मिळाला. हा निधी मार्च 2018 अखेर खर्च होणे अपेक्षीत आहे. मात्र, निविदा मान्यतेला होत असलेल्या विलंबामुळे हा निधी या आर्थिक वर्षात खर्च होईल असे वाटत नाही. त्यामुळे निधी पुन्हा शासनाच्या तिजोरीत जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या सुरू असलेल्या इमारतीच्या अंतर्गत सुविधाच्या कामाची गती ठेवण्यासाठी वितरीत केलेला निधी ठेव अंशदान स्वरुपात आमच्याकडे द्यावा, असे ससून प्रशासनाला सुचवले आहे.

मात्र, या विभागाने मागील वर्षीही 2016-17 मधील उरलेला 20.3 कोटी रुपयांचा निधीबाबत कोणताही अहवाल दिला नाही. त्यामुळे यंदाचा निधी परत गेल्यास याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल, असे ससून प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे हा निधी खर्च होतोय का परत जातोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)