पिंपरी – दिघी येथील समर्थ रेसिडेन्सी या बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडून अवघ्या तीन वर्षांच्या रितु यादव या चिमुकलीचा नुकताच दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात बांधकाम साईट जोरात सुरू आहेत. अनेक इंग्रजाळलेल्या गोंडस नावाखाली टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना कामगारांच्या सुरक्षिततेकडे बांधकाम व्यावसयिकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बांधकाम साईटवर होणाऱ्या अपघातामधील कामगारांच्या मृत्यूची आकडेवारी दिवसें-दिवस वाढत असताना आता त्यात त्यांच्या पाल्याच्या बळींचीही भर पडली आहे. मागील दोन वर्षात बांधकामाच्या ठिकाणी अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बहुसंख्य कामगार बांधकाम साईट सुरु असलेल्या ठिकाणीच राहतात. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे साईटवर आई-वडिल दोघांनाही काम करणे गरजेचे असते. त्यामुळे ते कामावर मुलांनाही सोबत आणतात. बांधकाम कामगारांच्या लहान मुलांची सुरक्षितता तसेच त्यांच्यासाठी बालवाडी व विविध उपाययोजना करणे त्या बांधकाम व्यावसायिकाला बंधनकारक आहे. मात्र, काही बांधकाम व्यावसायिकांकडून त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
बांधकामाच्या ठिकाणी बालवाडीची सोय दिली जात नसल्यामुळे साईटवर इतरत्र धोकादायक ठिकाणी मुलांचा वावर असतो. त्यातून बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्या, इमारतीचे डक्ट, बांधकाम सुरु असताना होणारे अपघात या चिमुकल्यांच्या जीवावर बेतत आहेत. सिमेंट, वाळू मुळे मुलांचा बांधकाम साईट परिसरातील वावर आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचा ठरत आहे. आरोग्य, शिक्षण, पोषक आहार अशा सगळ्याच पातळीवर ही मुले वंचित आहेत. बांधकाम कामगारांसह त्यांच्या मुला-बाळांनाही सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी केला. अशा घटना रोखण्यासाठी अपघाती साईटवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी कामगार उपायुक्त व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांचा बळी जात असताना बांधकाम कामगार विभाग, पोलीस प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. बांधकाम कामगारांच्या जीवाचे मोल प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांना नसल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक अपघाती साईटवर कडक कारवाई करत फौजदारी गुन्हे दाखल करावे. अन्यथा बांधकाम कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
– जयंत शिंदे, अध्यक्ष, बांधकाम कामगार सेना.
आणखी किती बळी घेणार?
– दिघी भागात पाण्याच्या टाकीत बुडून सुमित अनिल चौहान या साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू.
– वडगाव बुद्रुक येथील विकासनगर येथे जान्हवी कुंबर या अडीच वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू
– रहाटणीतील यशवंतनगर येथे आयुष शंकर पवार या तीन वर्षांच्या बालकाचा पाणाच्या टाकीत पडून मृत्यू
– भोसरी येथील बांधकाम साईटवर पाण्याच्या टाकीत पडून दोन बालकांचा मृत्यू.
– फुगेवाडी येथील सिरवी माता मंदिराजवळील एका साईटवर लिफ्टच्या डक्टमध्ये पडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू
– दिघी येथे या बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षांच्या रितु यादव हिचा मृत्यू
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा