बांगला देशचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय 

पहिला कसोटी क्रिकेट सामना : शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरी 
ढाका – अत्यंत रंगतदार ठरलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी मात करताना बांगला देश संघाने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अनुभवी शकिब अल हसनने अष्टपैलू कामगिरी बजावताना बांगला देशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

यजमान बांगला देश संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारल्यावर पहिल्या डावात 260 धावांची मजल मारली, ती शकिब अल हसनच्या 84 धावांच्या झुंजार खेळीमुळेच. त्यानंतर शकिबने केवळ 68 धावांत 5 फलंदाज परतविताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 217 धावांत गुंडाळून बांगला देश संघाला 43 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

ऑस्ट्रेलियाने बांगला देश संघाचा दुसरा डाव केवळ 221 धावांत रोखला. परंतु विजयासाठी 265 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 244 धावांत गुंडाळला गेला व त्यांना 20 धावांनी पराभव पत्करावा लागला. शकिब अल हसनने दुसऱ्या डावात 85 धावांत 5 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. मेहदी हसनने 80 धावांत 2, तर तईजुल इस्लामने 60 धावांत 3 बळी घेताना शकिबला सुरेख साथ दिली.
चौथ्याच दिवशी संपलेल्या या कसोटीतील सामनावीर पुरस्कारही शकिबनेच पटकावला. एकाच कसोटी सामन्यात अर्धशतक आणि 10 बळी अशी कामगिरी करणारा शकिब हा रिचर्ड हॅडली यांच्यानंतर पहिला खेळाडू ठरला. तसेच शकिबने अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी विश्‍वक्रमवारीतील आपला पहिला क्रमांक भक्‍कम केला.

त्याआधी कालच्या 2 बाद 109 धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियन संघ बांगला देशविरुद्ध सलग पाचव्या कसोटी सामन्यात विजयासाठीच सज्ज असल्याचे दिसत होते. परंतु शकिब आणि सहकाऱ्यांचा विचार वेगळाच होता. आज सकाळी ऑस्ट्रेलियाने पहिला बळी डेव्हिड वॉर्नरचाच गमावला. वॉर्नरने 135 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकारासह 112 धावांची खेळी करताना कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. परंतु वॉर्नर बाद होताच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले व त्यांचा डाव कोसळला.
स्मिथने वॉर्नरच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी करताना 37 धावांची खेळी केली. तर पॅट कमिन्सने तीन चौकार व 2 षटकारांसह 33 धावांची झुंजार खेळी करताना ऑस्ट्रेलियाची आगेकूच कायम राखली. परंतु तईजुल इस्लामने हॅझेलवूडला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.

बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना आपल्या संघाचा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत जातीने हजर होत्या. त्यांनी बांगला देशचा राष्ट्रध्वज फडकावून आपल्या संघाला प्रोत्साहन दिले. आता उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना येत्या 4 सप्टेंबर रोजी चितगांव येथे सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हॅझेलवूड दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे.
संक्षिप्त धावफलक-
बांगला देश- पहिला डाव- सर्वबाद 260,
ऑस्ट्रेलिया- पहिला डाव- सर्वबाद 217,
बांगला देश- दुसरा डाव- सर्वबाद 221,
ऑस्ट्रेलिया- दुसरा डाव- सर्वबाद 244
(डेव्हिड वॉर्नर 112, स्टीव्हन स्मिथ 37, पॅट कमिन्स 33, गोलंदाजी- शकिब अल हसन 85-5, तईजुल इस्लाम 60-3, मेहदी हसन 80-2).सामनावीर- शकिब अल हसन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)