बांगलादेशातील आगीत 70 ठार

रसायनांच्या गोदामाच्या आगीत पाच मजली इमारत कोसळली

विवाह समारंभही जळून खाक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये रसायनांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बांगलादेशाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात भीषण अग्नी दुर्घटना आहे.

बांगलादेशच्या ऐतिहासिक महत्व असलेल्या भागात एका अपार्टमेंटमध्ये असलेल्या पाच मजली गोदामाला ही आग लागली होती. बुधवारी रात्री गजबजलेल्या चौकबझार भागातील एका मशिदीच्या मागे असलेल्या हाझी वहीद मन्शन नावाच्या गोदामाच्या तळमजल्यावर ही आग लागली आणि अल्पावधीतच ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यांवरही पसरली. या आगीच्या ज्वाळांमुळे शेजारील इमारतींमध्येही आग पसरली. त्यात जवळच असलेल्या सभागृहालाही आग लागली. या सभागृहामध्ये विवाहानिमित्त विशेष समारंभ सुरु होता. गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा केला होता. त्यामुळे आग झपाट्याने पसरली, असे ढाक्‍याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगीमध्ये जखमी झालेल्यांची संख्या खूप जास्त असल्याने मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्‍त होत आहे. आग लागलेली इमारत गजबजलेल्या भागात असल्याने अग्निशामक दलाला तेथपर्यंत पोहोचणे अवघड होत होते. ही आग गॅस सिलिंडरमुळे लागल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप असल्याने आतील नागरिकांना सुटकेसाठी बाहेर पडणे शक्‍य झाले नाही. या आगीत रस्त्यावरून जाणारे पादचारी, विवाह समारंभातील नागरिक आणि जवळच्या रेस्टॉरंटमधील ग्राहकही होरपळले. जखमी झालेल्यांमध्ये महिला व मुलांचाही समावेश असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. काही नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या. त्यामुळे ते जखमी झाले आहेत.
आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 37 बंब कार्यरत होते.

आगीमुळे इमारतीतील विद्युत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही कारनीही पेट घेतला होता. आग लागलेली पाच मजली इमारत आगीमुळे पूर्णपणे जळून गेली आणि थोड्याच अवधीमध्ये जमिनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेले असल्याची भीती व्यक्‍त होत आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्‍त केले आहे. आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक तपास पथक नियुक्‍त करण्यात आले आहे.

सुरक्षिततेच्या नियमांबाबत निष्काळजीपणा…
आज रसायनांच्या गोदामाला लागलेल्या आगीमुळे बांगलदेशात 2010 साली लागलेल्या भीषण आगीच्या आठवणी ताज्या झाल्या. जुन्या ढाक्‍यामध्ये अशाच एका रसायनांच्या गोदामाला लागलेल्या आगीमध्ये 120 जणांचा मृत्यू झाला होता. त्या आगीच्या दुर्घटनेनंतर रसायनांच्या कारखान्यांविषयी आणि गोदामांविषयी प्रचंड मोठा सामाजिक असंतोष निर्माण झाला होता. मात्र आगीच्या त्या घटनेच्या 9 वर्षांनंतरही अशा रसायनांच्या गोदामे आणि दुकानांबाबत विशेष कोणतीही कारवाई केली गेली नाही. सुरक्षिततेच्या मार्गदर्शक नियमांची अंममलबजावणी कठोरपणे न झाल्याने 2013 साली ढाक्‍यातीलच कपड्यांच्या कारखान्यालाही आग लागली होती. ही इमारत कोसळल्याने 1,100 जण मरण पावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)