बांगलादेशमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. इमर्जिंग चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. 15 ते 26 मार्चदरम्यान बांगलादेशमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2013 मध्ये ही स्पर्धा यापूर्वी खेळवण्यात आली होती. ही स्पर्धा एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेकडून भरवली जाते. या स्पर्धेसाठी संघातील चार खेळाडू हे 23 वर्षापेक्षा अधिक वयाचे असतील. तर बाकी खेळाडू हे 23 वर्षापेक्षा कमी वयाचे असणार आहेत. तसेच या स्पर्धेतील सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील अशी स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. त्यानंतर बाद फेरीद्वारे अंतिम फेरीसाठी संघनिवड होणार आहे. बीसीसीआयचे अधिकारी एमव्ही श्रीधर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. भारतीय संघ इमर्जिंग चषक स्पर्धेत जरुर सहभागी होणार असून भारत-पाकिस्तान यांच्यातील ही द्विपक्षीय मालिका नाही. ही स्पर्धा वेगळी आहे त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तानयांच्याव्यतिरिक्त बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, हॉंगकॉंग आणि नेपाळ या संघाचा समावेश असणार आहे. या स्पर्धेदरम्यानच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका असल्याने 23 वर्षावरील 4 क्रिकेटपटू हे भारताच्या नियमित संघातील नसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)