खुशखबर ! बहुतांश धरणे ‘ओव्हर फ्लो’

बाप्पा पावला : मोठ्या विश्रांतीनंतर जिल्हाभर पाऊस

पुणे – गेले तीन ते चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्याचबरोबर सोलापूर शहरासाठी वरदान असलेले उजनी धरणसुध्दा 85 टक्के भरले आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. जिल्ह्यातही अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 98 टक्के धरणे पूर्ण भरली असून त्यातून विसर्गही सुरू करण्यात आला आहे. तर काही धरणे लवकरच भरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यातून कधीही विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असे सिंचन विभागाने सांगितले.

सध्या खडकवासला, पानशेत, मुळशी, पवना, कासारसाई, डिंभे, वडिवळे, घोड, भामा-आसखेड, आंद्रा,चासकमान,निरा-देवधर कळमोडी, वडज, या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्यात सर्वाधिक विसर्ग मुळशी धरणातून सध्या 7 हजार 915 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढवल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. खडकवासला धरणातूनसुध्दा रात्री उशिरापर्यंत 1712 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तर, पानशेत धरणातून 1980 क्‍यसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी उजनी धरणात मिळत असल्याने या धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळीपर्यंत या धरणामध्ये 45.45 टीएमसी साठा जमा झाला होता. टक्केवारीमध्ये हे धरण सुमारे 85 टक्के भरले आहे.

वरसगाव आणि भाटघर ही धरणेसुध्दा भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणातून कधीही विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. सोमवारी रात्रीपर्यंत वसरगाव धरण 94.83 टक्के भरले. सध्या या धरणामध्ये 12.16 टीएमसी पाणीसाठा आहे. भोर येथील भाटघर धरण हे 96.92 टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील सगळीकडे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने आता वर्षभर तरी शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. त्याचबरोबर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)