बहुगुणी लवंग

लवंगेने उष्णता आणि वेलदोड्याने थंडी अशी आपल्या मराठीत म्हण आहे. नाजूक प्रकृतीचे वर्णन करण्यासाठी ती वापरली जाते. लवंग गुणधर्माने उष्ण असली तरी तिचे औषधी गुणधर्म फार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच भारतीय मसाल्यांमध्ये लवंग प्रामुख्याने वापरली जाते. विडा बंद करताना त्यावर लवंग टोचली जाते. हेतू हा की जेवणानंतर एक लवंग खाल्ली गेली की पचनक्रिया व्यवस्थित व्हावी. आपल्या पूर्वजांनी सगळ्या गोष्टींचा शास्त्रीय उपयोग व महत्त्व जाणून त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात एवढा चपखल वापर केला आहे. अनेकदा आपले या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते.

अपर्णा ओक

एवढीशी ही लवंग, पण तिला आपल्या रोजच्या आहारात व्यवस्थित स्थानापन्न केले आहे. बघा ना, महाराष्ट्रात नारळीभाताला लवंगेचा स्वाद आणि सुगंध आल्याखेरीज त्याची पूर्तता कशी होणार?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंदीत लवंगेला लॉंग, लवंग म्हणतात. तर बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये मराठीप्रमाणेच लवंग हेच नाव आहे. इंग्रजीत याला उर्श्रीेंश म्हणतात. याचे शास्त्रीय नाव आहे उररूेहिूश्रर्श्रीी रीोरींळर्लीी आणि कूळ आहे चूीींरलशरश. संस्कृतमध्ये लवंग, देवकुसुम, भ्रिगंगा, शेखर, श्रीप्रसून म्हणजे सुंदर फुले असणारी, चंदनपुष्पक म्हणजे चंदनाप्रमाणे सुवासिक, वारीजा इ. अनेक समर्पक नावे आहेत. दक्षिण भारत, श्रीलंका, मॉरीशस, टांझानिया, सिंगापूर इ. ठिकाणी लवंगेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. लवंगाचे फूल, पाने, मूळ इ. भाग औषधी असतात. आपण जी लवंग बघतो आणि वापरतो ती लवंगाचे वाळलेले फूल असते. जास्त करून लवंग पावडर व तेल स्वरूपात औषधी उपयोगांसाठी वापरली जाते.

देवपुष्पोद्भवं तैलं अग्निकृतं वातनाशनम्‌ ।
दन्तवेष्ट कफार्तिघ्नं गर्भिण्या वमनापहम्‌।।
लवं च तिक्तं कटु कफापहम्‌ ।
लघु तृष्णापहं वक्‍त्रं क्‍लेद दौर्गन्ध्य नाशनम्‌।।
– सु.सं.

प्राचीन काळापासून आयुर्वेदाने लवंगेचे औषधी गुणधर्म जाणले आहेत. आयुर्वेदानुसार लवंग तीक्ष्ण, शीतल, पाचक, रुचीकारक, तसेच उत्तेजक असते. तहान, कोरड पडणे, उचकी, खोकला, रक्तविकार, क्षय इ. रोग दूर करण्यात लवंग मदत करते. लवंगामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फोरस, लोह, मॅंगेनीज, फायबर्स, आयोडीन, व्हिटॅमिन के व सी, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्‌स इ. घटक असतात. लवंगामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे ‘युगेनॉल’. दातांसाठी लवंग अतिशय लाभदायक आहे. लवंग ही फक्त खाण्यातूनच औषधी आहे असं नाही तर दातांचे मंजन, साबण इ. मधून तसेच अनेकवेळा लवंगाचे तेल औषधी म्हणून वापरले जाते. उदा. मान दुखत असेल किंवा गळा सुजला असेल तर मोहरीच्या तेलाबरोबर लवंगतेलाने मालिश केल्याने दुखणे दूर होते.

पोटासाठीही लवंग उत्तम आहे. उलटी किंवा मळमळ होत असेल तर लवंगाची पावडर मधात मिसळून चाटावी. उलटी बंद होते. पोटात गॅसेस झाले असतील तर एक कप उकळत्या पाण्यात दोन लवंगा वाटून टाकाव्या. थंड झाल्यावर हे पाणी प्यायल्याने पोटातील गॅसेस दूर होतात. लवंग कृमिनाशक व जंतुघ्न असल्यामुळे त्वचेच्या जखमेवर किंवा कापलेल्या जागी लवंगाची पेस्ट लावली असता, जखम लवकर बरी होते. संधिवाताचा त्रास असेल तर रोज लवंग खावी. लवंगाची पेस्ट बनवून किंवा लवंगाचे तेल दुखऱ्या सांध्यावर लावावे. त्यामुळे सांध्यातील वेदना दूर होते. वयानुसार त्वचेवर, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. लवंगामधील ऍन्थोकाईनिन या ऍन्टिऑक्‍सिडन्टमुळे, रोज लवंग खाल्ल्यामुळे, त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्वचा तरुण दिसू लागते.

दातांसाठी लवंग वरदानच आहे. दातांमध्ये खूपच वेदना होत असतील तर पाच लवंगा वाटून त्यात लिंबूरस घालून ते दातांवर चोळल्यास वेदना थांबतात. त्याचबरोबर पाच लवंगा एक ग्लास पाण्यात उकळवाव्या आणि या पाण्याने गुळण्या केल्यास वेदना थांबते. किडलेल्या दातांवर लवंगाचे तेल नियमितपणे लावल्यास दातांमधील कीड नष्ट होते. तसेच लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडाची दुर्गंधी जाते आणि श्‍वास निरोगी व स्वच्छ होतो. साधी सर्दी, नाक चोंदणे, गळ्यात खवखव, विषाणूसंसर्ग, अस्थमा, ब्रॉन्कायटीस, सायनस इ. विविध श्‍वसनाशी संबंधित आजारांवर लवंग गुणकारी आहे. सर्दीमुळे नाक चोंदले असेल, श्‍वास घ्यायला त्रास होत असेल तर रुमालावर लवंग तेलाचे दोन-तीन थेंब टाकून त्याचा वास घेत राहावा. बंद नाक लगेचच मोकळे होते. किंवा गरम पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब टाकून त्याचा वाफारा घ्यावा. ज्या लोकांना खूप तहान लागते, जास्त घाम येतो, त्यांनी गरम पाण्यात लवंग पावडर घालून प्यावी. हैजासारख्या भयंकर रोगात लवंगाचे तेल बत्ताश्‍यामध्ये घालून खावे, लगेचच फरक पडतो. सर्दीमुळे किंवा नुसती डोकेदुखी, मायग्रेन असेल तर रुमालावर लवंगतेलाचे काही थेंब टाकून ते हुंगावे व तो रुमाल माथ्यावर पंधरा मिनिटे ठेवावा. त्यामुळे तेथील रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन डोके दुखायचे थांबते. कान दुखत असेल तर लवंग तेल व तिळाचे तेल सम प्रमाणात घेऊन गरम करावे. त्यात कापूस बुडवून तो कानात ठेवावा. यामुळे कान दुखायचा थांबतो व कानातील जंतूसंसर्गही बरा होतो.

रोजच्या आहारात दोन-तीन लवंगा नियमित घेतल्याने आपली प्रकृती उत्तम राहते. कोलेस्टरॉलची मात्रा नियंत्रणात राहिल्याने हृदय तंदुरुस्त राहते. मधुमेह असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. लवंग घातलेला चहा प्यायल्याने मन ताजेतवाने होऊन नव्या दमाने काम करायला स्फूर्ती मिळते. सर्दी, खोकला, डोकेदुखी, अपचन, गॅसेस यासारख्या नेहमी डोकावणाऱ्या आजारांपासून सुटका होते. बस्स माणसाला आणखी काय हवं?

अशी ही लवंग आहेच बहुगुणी.. तिचा औषधी उपयोग जाणून घेऊन योग्य प्रमाणात वापर करायला हवा. सहजगत्या मिळणारी, सहज वापरता येणारी लवंग.. पावडर करून ठेवा. लवंग तेल घरात असू दया.. शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरुस्त आणि मन प्रसन्न तर घर प्रसन्न!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)