वडूज – गेल्या काही दिवसांपूर्वीच नव्याने रुजू झालेले पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांनी वडूज बसस्थानकाच्या परिसरात बुलेट गाडीच्या फायरिंगचा आवाज करत घिरट्या मारणाऱ्या युवकाला पकडून कारवाई केली. या कारवाईने दुचाकी रायडर्सचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
वडूज बसस्थानक परिसरात बुलेटवरून तीन युवक फायरिंगचा मोठा आवाज करत जात होते. अनिल वडनेरे यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी गाडी थांबवण्यास सांगितली. चालकास गाडीची कागदपत्रे व लायसन्स दाखवण्यास सांगितली व गाडी पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. तेथे वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 1700 रुपये दंड करण्यात आला.
संबधित युवकाची चौकशी सुरू असतानाच बसस्थानक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या कारवाईची माहिती समजताच बसस्थानक परिसरातील टवाळखोरांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली.
बसस्थानक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरून धूमस्टाईलने गाडी चालवत दंगा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ट्रीपल सीट, विनापरवाना गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, अशा प्रकरणात जास्त वाढ झाली आहे. यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करून या दुचाकी रायडर्स यांच्यावर वचक ठेवणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरकांच्यातून आता उमटू लागल्या आहेत.
वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाई
शहरात अस्ताव्यस्त वाहने लावून वाहतूक कोंडी करणाऱ्या, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, सुसाट वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
– अनिल वडनेरे
उपविभागीय पोलीस अधिकारी
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा