बसस्थानकातील हिरकणी कक्ष राहिला नावापुरता

तक्रार निवारण, मोफत पास विभागही या कक्षात : लेकुरवाळ्या मातांची गैरसोय

दीपक देशमुख
सातारा,  – राज्यातील प्रत्येक बसस्थानकात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली असली तरी साताऱ्यामध्ये या कक्षात अपंग प्रवाशी तक्रार निवारण केंद्र, अंध-अपंग पास, एसटी-चालक-वाहक मोफत पास असेही विभाग चालत आहेत. त्यामुळे याठिकाणी असलेल्या वर्दळीमुळे महिला या कक्षात येत नसल्यामुळे हिरकणी कक्षाचा मुळ उद्देश बाजूला पडला असून केवळ कागदोपत्री योजना राहिली आहे. तसेच येथील कर्मचारी जाग्यावर नसल्यास कक्ष बंद असतो.
राज्यातील प्रत्येक बसस्थानकामध्ये स्तनदा मातांसाठी लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या कक्षांचा वापर सध्या अनेक ठिकाणी मातांऐवजी स्थानकप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी कार्यालय म्हणून तसेच गोडावून, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठीच केला आहे. सातारा बसस्थानकातील हिरकणी कक्षाची अवस्थाही याहून वेगळी नाही. काही वर्षांपूर्वी शासनाने हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. यानंतर सातारा बसस्थानकात जागा नसल्यामुळे येथील अपंग तक्रार निवारण कक्षावरच हिरकणी कक्ष म्हणून पाटी लागली. तथापि, बऱ्याच महिलांना याठिकाणी हिरकणी कक्ष याठिकाणी आहे, हेच माहित नाही. शिवाय अपंग प्रवाशी तक्रार निवारण कक्ष, अंध-अपंग मासिक पास, चालक-वाहक यांच्यासाठी असलेले एसटी पास आदी कामेही याठिकाणी होत असल्यामुळे वर्दळ असते. यामुळे ज्यांना याबाबत माहिती आहे, त्या महिलासुद्धा याठिकाणी येत नाहीत. यामुळे अनेकदा मातांना बाळ रडू लागल्यास मातेपुढे द्विधास्थितीत सापडते. मातेला सुरक्षितपणे बाळाची भूक भागवता येईल, असा सुरक्षित हिरकणी कक्ष उभारण्याबाबत म्हणावी तशी जनजागृती न झाल्यामुळेच या उपक्रमाचा बहुतांशी फज्जा उडाला आहे. सातारा बसस्थानक प्रशस्त जागेत उभाण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या जागेत या मातांसाठी थोडीशी जागा उपलब्ध होवू शकत नाही, ही खेदाची बाब आहे. सातारा बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशी येत असतात. हरतऱ्हेची बरी-वाईट माणसे यामध्ये असतात. त्यामुळे एसटी प्रशासनाने स्तनदा मातांचा विचार करून स्वतंत्रपणे हिरकणी कक्षाची उभारणी करण्याची गरज आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)