बसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी

  • टवाळखोरांची हुल्लडबाजी : प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली-पिंपरीगाव या मार्गावर धावणाऱ्या बसमधील टवाळखोर विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे विद्यार्थिनींना व प्रवाशांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विद्यार्थीनी व प्रवाशी अक्षरश: हैराण झाले आहेत. वाहकदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या मार्गावरील बसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची आग्रही मागणी प्रवाशांकडून होत आहे.

“पीएमपीएमएल’ची चिखली ते पिंपरीगाव बससेवा (मार्ग क्र. 326) सुरु आहे. याचा दररोज हजारो प्रवांना लाभ होत असून, यामुळे “पीएमपीएमएल’च्या उत्पन्नात भरदेखील पडत आहे. यामुळे चिखलीतील विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. दररोज सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत विद्यार्थ्यांची या मार्गावरील बसमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, प्रवास करणाऱ्या काही टारगट शालेय विद्यार्थ्यांच्या टोळक्‍याची दररोज बसमध्ये हुल्लडबाजी सुरु असते. विद्यार्थिनींकडे पाहून शेरेबाजी करणाऱ्या अनेक टारगट विद्यार्थ्यांमुळे अनेक विद्यार्थीनी दुसऱ्या बसने प्रवास करणे पसंत करतात.

याशिवाय चिखलीपासून केवळ मोरवाडीपर्यंतच शेअर-ए-रिक्षा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थीनींना नाईलाजाने या बसने प्रवास करावा लागत आहे. या बसमधून याच शाळेच्या शिक्षिका व इतर प्रवासीदेखील दररोज प्रवास करतात. या टारगट विद्यार्थ्याच्या हुल्लडबाजीकडे वाहकाकडून सुर्लक्ष केले जाते. उलट एखादा मित्र असल्याप्रमाणे या वाहकाकडून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत बसमध्ये पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

अनेकदा सकाळी या बसमधून बस प्रवास करताना टवाळखोर विद्यार्थ्यांच्या टोळक्‍याचा त्रास सहन करावा लागतो. वाहकाकडूनदेखील त्यांना प्रतिबंध केला जात नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. हा त्रास असाच सुरु राहिल्यास अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण कायम बंद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
– आशा शिंदे, एक महिला प्रवासी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)