बसमधून 30 लाखांचे दागिने लंपास

पिंपरी – बसमधून प्रवास करणाऱ्या कुरियर कर्मचाऱ्याकडून दोन आरोपींनी सुमारे तीस लाख रुपये किंमतीचे सोने व हिऱ्याचे दागिने लंपास केले. बेंगलुरु-मुंबई महामार्गावर पुनावळे येथे एका हॉटेलसमोर बस थांबली असता कार मधून आलेल्या दोघांनी ही चोरी केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय 24, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तेलंगणा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिकंदराबाद येथील भवानी एअर लॉजिस्टिक या कुरिअर कंपनीत मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. ही कंपनी सोन्याचे दागिने, हिरे असा किंमती ऐवज एका व्यापा-याकडून दुस-या व्यापा-याला कुरिअरच्या माध्यमातून पोहोचवते. एक कुरिअर घेऊन फिर्यादी सिकंदराबादहून मुंबईला खाजगी ट्रॅव्हल्स बसने (के ए 41 / ए 7777) जात होते. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बस पुनावळे येथे सागर हॉटेल समोर थांबली. त्यावेळी एका कारमधून आलेल्या दोघांनी बसमध्ये दीपक यांच्या सीटखाली ठेवलेल्या बॅगमधील 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि डायमंड चोरून नेले. याबाबत सोमवारी (दि. 18) हिंजवडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)