बलात्कार प्रकरणात जबाब बदलल्यास पीडितेवरही खटला 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : आरोपीची याचिका फेटाळली 
नवी दिल्ली: बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी जर पीडितेने जबाब बदलल्यास किंवा समझोता केल्यास संबंधितावरही खटला चालविण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 2004 मधील एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे मत नोंदविले आहे. तसेच उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आरोपीची याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती रंजन गोगाई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय खंडपिठाने हा निर्णय दिला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने म्हटले की, हे केवळ अशाच खटल्यांमध्ये लागू होईल ज्यात आरोपीविरोधात सबळ पुरावे असतानाही पीडित व्यक्ती आपला जबाब बदलून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. कारण, बऱ्याचदा आरोपी पीडितांच्या संपर्कात येऊन न्यायालयाबाहेर तडजोड करण्याचा प्रयत्न करतात.
2004मधील एका बलात्कार प्रकरणातील खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अनेक प्रमुख गोष्टींवर भाष्य केले. जबाब नोंदवण्याचा उद्देश सत्य समोर आणणे हा आहे. चौकशी कशी व्हावी हे प्रत्येक खटला आणि त्याच्याशी जोडलेल्या तथ्यांवर अवलंबून असते. कोणाला निर्दोष मानने आणि पीडित व्यक्तीच्या हक्कांमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. आरोपी किंवा पीडित व्यक्ती यापैकी कोणालाही हक्क नाही की त्यांनी फसवणूकीद्वारे आपला जबाब पलटवावा. न्यायालय म्हणजे काही गंमत करण्याचा विषय नाही, अशा कडक शब्दांत न्यायालयाने इशारा दिला.
2004मध्ये एका 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावेळी पीडितेने आपल्या आईच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आरोपीविरोधात एफआयआर नोंदवली होती. यासाठी पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्याचबरोबर ओळख परेड दरम्यान पीडितेने आरोपीला ओळखलेही होते. मात्र, सहा महिन्यांनंतर न्यायालयात पीडित मुलीने आपला जबाब बदलला. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपीला निर्दोष ठरवत मुक्त केले होते.
मात्र, त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय बदलत पीडितेचे वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत 12 वर्षांची शिक्षा सुनाविली. या शिक्षेविरोधात आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे आरोपीची याचिका फेटाळण्यात आली.
तर कोर्ट शांत बसणार नाही 
गुजरात उच्च न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, बलात्कारीत पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे तिच्यावर आरोपीने दबाव टाकल्यानेच तिने आपला जबाब बदलला. त्यामुळेच कोर्टाने विशेष टिपण्णी करताना म्हटले की, जर बलात्कार पीडित व्यक्तीने कोणत्याही दबाखाली येऊन आपला जबाब बदलल्यास कोर्ट शांत बसणार नाही. सत्य समोर आणलेच जाईल.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)