बलात्कार प्रकरणातील नराधमाला तीन दिवसांची कोठडी

वाकी-विवाह करण्याचे खोटे आमिष दाखवून चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे सध्या वास्तव्यास असलेल्या आणि मुळच्या पश्चिम बंगालच्या 32 वर्षीय तरुणीचे सुमारे दहा वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बारामती तालुक्‍यातील कटफळ येथून गजाआड करण्यात आलेल्या सोलापूरच्या 32 वर्षीय नराधमास तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमोल सिदप्पा परीट (वय 32, रा. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे अटक करून पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. परीट या घटनेनंतर फरारी होता. त्यास चाकण पोलिसांनी कटफळ (बारामती, जि. पुणे) येथून गजाआड केले होते. पीडित तरुणीसोबत अमोल याने प्रेमसंबंध निर्माण करून हळूहळू सुत जुळविले. त्यानंतर महाळुंगे (ता. खेड) येथे एक भाड्याची खोली घेऊन त्या ठिकाणी वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, त्या पीडितेने लग्नासाठी वारंवार तगादा लावताच त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास चक्क नकार देत तिला काहीच थांगपत्ता लागू न देता मूळ गावी पोबारा केला होता. याप्रकरणी त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात जबरी बलात्कार व फसवणुकीचा असा दुहेरी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील दोन महिने पोलीस त्या संशयित नराधमाचा शोध घेत होते.
पीडित तरुणी ही मुळची पश्चिम बंगाल येथील असून, चाकण येथील औद्योगिक वसाहतीत ती नोकरीस आहे. तर आरोपी अमोल परीट हा चाकण एमआयडीसीमध्ये नोकरीस होता. यातील फिर्यादी पीडिीत युवतीशी सन 2006मध्ये अमोल याची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर त्यांचे सूत जुळल्याने सन 2007मध्ये संशयित आरोपी अमोल याने पीडित युवतीला “”आपण दोघे संगनमताने लग्न करुन चाकण एमआयडीसीमधील कंपनीत काम करुन एकत्र राहू,” असे म्हणून विवाह करण्याचे खोटे आमिष दाखवले. महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे एक खोली भाड्याने घेऊन त्यात दोघे राहण्यास आले. त्यानंतर त्याने पीडित युवतीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन सलग दहा वर्षे वेळोवेळी लैंगिक शोषण केले. फिर्यादी पीडितेने आरोपी अमोल यास लग्नाबाबत विचारणा करण्यास सुरूवात केल्यानंतर त्याने वेळोवेळी तिला शिवीगाळ व दमदाटी केली. संशयित आरोपी अमोल हा 4 डिसेंबर 2017 रोजी युवतीस काहीच तपास लागू न देता तिला सोडून त्याच्या निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) या मूळ गावी निघून गेला.
जून 2007 ते 4 डिसेंबर 2017 या कालावधीत त्याने वेळोवेळी तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अमोल परीट या नराधामावर चाकण पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीचा असा दुहेरी गुन्हा दाखल केला होता; मात्र तेव्हा पासून तो गायब झाला होता. अमोल बारामती येथे असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हवालदार वीरसेन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने त्याला बारामती येथील कटफळ भागातून ताब्यात घेतले आहे. त्याला खेडच्या न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला सलग तीन दिवस (दि. 18 मे) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)