बलात्कार थांबविता येत नसेल तर…!

 दिल्ली वार्ता

  वंदना बर्वे

जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदते ती भारतात. अमेरिका-फ्रांस-रशियासारखे मित्र देश, भुवया वळविल्या तरी चीनला धडकी भरावी एवढी भारताची दहशत, आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येएवढं सैन्यबळ असलेल्या भारत सरकारला देशातल्या लहान मुलींवर होणारे बलात्कार थांबविता येत नसतील तर… काय उपयोग या सर्व गोष्टींचा?

-Ads-

जम्मू काश्‍मीरच्या कठुआ आणि यूपीच्या उन्नावमधील बलात्काराच्या घटनांमुळे या देशातील सामान्य माणसाचं काळीज फाटलं आहे. रांगत-रांगत अंगणात गेलेल्या मुलीचं कुणी अपहरण तर केलं नसावं? एवढी भीती प्रत्येक आई-वडिलांच्या मनात निर्माण झाली आहे. दुर्दैवाने, एखाद्या मुलीसोबत बरं-वाईट झालं आणि तक्रार केली तर पोलीस बापाला जिवंत ठेवतील काय, एवढी धास्ती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

सत्ताधीशांच्या डोक्‍यात व्होटबॅंकेचं राजकारण नसतं, तर लोकांच्या मनात कायद्याची भीती सहज निर्माण करता आली असती. आणि आसिफा-आशा या चार-आठ वर्षांच्या मुली बापाच्या अंगणात खेळताना-बागडताना दिसल्या असत्या. दुर्दैवानं असं व्हावं हे कुणालाही वाटत नाही. समाजातील गिधाडं दररोज कितीतरी “निर्भया’चे लचके तोडतात. आणि “न्याय झाल्याशिवाय राहणार नाही’, असं आश्‍वासन देण्यापलिकडे सरकारला काही करता येत नाही!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच काहीतरी करण्याची गरज आहे. देशात त्यांची सत्ता आहे म्हणून नव्हे तर; त्यांच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून. आज भाजपची सत्ता आहे उद्या कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाची असेल. मात्र, आजच्या घडीला नरेंद्र मोदी देशाचे सर्वेसर्वा आहेत. आणि ते राजकारणापलिकडे जावून देशाचा विचार करतात.

कठुआ आणि उन्नावच्या घटनेमुळे कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्ष सरकारविरूध्द आक्रमक झाले आहेत. कारण, देशात भाजपची सत्ता आहे. याच ठिकाणी कॉंग्रेस सत्तेत असती तर भाजपनेही तेच केले असते. म्हणून, राजकीय पक्ष सध्या जे काही करीत आहेत ते फक्त आणि फक्त व्होटबॅंकेचे राजकारण आहे, असं म्हणायला हरकत नाही. यूपीच्या निवडणुकीपूर्वी एका नेत्याने बसपा प्रमुख मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे भडकलेल्या बसप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याचवेळेस भाजपाने “बेटी के सम्मान में, बीजेपी मैदान में’ हा नारा देवून युपीची हवा गरम करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविण्याची तयारी केली होती. सांगायचे एवढेच की, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो. दुर्दैवाची बाब म्हणजे, विरोधी पक्षाला मूळ समस्येशी काहीही देणेघेणे नसते.

जम्मू काश्‍मीरातील कठुआ येथील आठ वर्षाच्या मुलीवर सतत सात दिवस झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर निर्घृण हत्या. या घटनेने अख्खा देश हळहळला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे. यात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, चार पोलीस अधिकारी आणि एका अल्पवयीन व्यक्तीचा समावेश आहे. ही मुलगी एखाद्या मुलासोबत पळून गेली असेल, असेही एक पोलीस कर्मचारी म्हणाला. ही बातमी पसरताच गुज्जरांनी निदर्शने करायला सुरुवात केली. रास्ता रोको केला. अखेर मुलीच्या शोधासाठी दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यातला एक दीपक खजुरिया यालाच नंतर गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पाच दिवसांनंतर आसिफाचा मृतदेह सापडला. तिचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते. पाय तोडण्यात आले होते. नखं काळी पडली होती आणि दंडावर आणि बोटांवर लाल खुणा होत्या, असे आई नसीमा हिने सांगितले. मुलीचा मृतदेह सापडल्याच्या सहा दिवसांनंतर जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी क्राईम ब्रांचला घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीतून समोर आले की, काही दिवस तिला स्थानिक मंदिरात बांधून ठेवण्यात आले आणि औषध देऊन तिला बेशुद्धावस्थेत ठेवण्यात आलं.

आरोपपत्रानुसार तिच्यावर काही दिवस सातत्याने बलात्कार करण्यात आला, तिचा छळ करण्यात आला आणि शेवटी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी दोनदा तिच्या डोक्‍यावर दगडानं वार करण्यात आले, असे पोलीस तपासातून पुढे आले आहे. साठ वर्षीय निवृत्त शासकीय अधिकारी संजी राम यांनी पोलीस अधिकारी सुरेंद्र वर्मा, आनंद दत्ता, तिलक राज आणि खजुरिया यांना हाताशी धरून हा गुन्हा केला. राम यांचा मुलगा विशाल, त्यांचा अल्पवयीन भाचा आणि त्याचा मित्र परवेश कुमार यांच्यावरही बलात्कार आणि खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांच्या मते, मुलीचे रक्ताळलेले आणि मातीने माखलेले कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्यांनी धुतले होते. या घटनेमुळे हिंदूबहुल जम्मू आणि मुस्लीमबहुल काश्‍मीर यांच्यात असलेला अंतर्विरोध चव्हाट्यावर आला आहे. सन 1989 मध्ये काश्‍मीर खोऱ्यात भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळी करण्यात आली होती, तेव्हापासून तिथलं वातावरण तणावपूर्ण आहेच.

या घटनेमुळे जम्मूत निदर्शनं करण्यात येत आहेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयात प्रवेश करणाऱ्या पोलिसांना अडवण्याचा वकिलांनी प्रयत्न केला. तसेच आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या निदर्शनात भाजपाचे दोन मंत्रीही सहभागी होते. जम्मू-काश्‍मीरमध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांची आघाडी सत्तेवर आहे.जम्मूत राहणाऱ्या गुज्जर समुदायाच्या मनात दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असं चौकशी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. चरण्यासाठी मेंढपाळ जम्मूमधल्या सार्वजनिक आणि वनजमिनीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी या प्रदेशातल्या हिंदू लोकांशी त्यांचा वाद निर्माण झाल्याचे समजते.

आरोपींच्या वतीने निदर्शने करणाऱ्या वकिलांपैकीच असलेल्या अंकुर शर्मा यांनी आरोप केला आहे की, भटके मुसलमान हिंदूबहुल जम्मूची संरचना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या जंगलांवर आणि पाणी स्रोतांवर अतिक्रमण करत आहेत. आरोपींवर खोटे आरोप करण्यात आले आहेत आणि खरे गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत.जम्मूमध्ये या गुन्ह्यावर जास्त लक्ष केंद्रित झाले नसले तरी श्रीनगरच्या वर्तमानपत्रांनी या घटनेला पहिल्या पानावर स्थान दिलं आहे. गुज्जर नेते मियान अल्ताफ यांनी जम्मू-काश्‍मीरच्या विधानसभेत या वर्तमानपत्रांतील बातमी झळकवत चौकशीची मागणी केली. माणुसकीला काळीमा फासणारी बाब म्हणजे, मुलीचे शव स्मशानभूमीत दफन करायचं होते. मात्र, अंत्यविधीसुध्दा करू दिला गेला नाही.

यामुळे सात मैल अंतर चालून मुलीच्या शवाला दुसऱ्याच गावात दफन करावं लागले, असे वडील पुजावाला यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात पुजावाला यांच्या दोन्ही मुली मरण पावल्या होत्या. यानंतर पत्नीच्या आग्रहामुळे पुजावाला यांनी भावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. याच मुलीवर हा प्रसंग ओढवला.चार-पाच वर्षांच्या मुलींवर बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या घटना खूप घडायला लागल्या आहेत. देशाच्या कुठल्या तरी भागात कितीतरी निर्भया रोज बळी पडतात. सरकारला चार-पाच वर्षांच्या मुलींवर होणारे सामूहिक बलात्कार थांबविता येत नसतील तर… काय उपयोग या सर्व गोष्टींचा! यावर कोणीच, कधीच आणि काहीच विचार करणार नाही का?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)