बलात्काराच्या बनावाने भोसरी पोलिसांची पळापळ

– वडील ओरडले म्हणून अल्पवयीन मुलीने रचली कथा

पिंपरी – एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आणि नागपूर ते पिंपरी चिंचवडमधील भोसरीपर्यंत पोलिसांची पळापळ झाली. आपले नाव, पत्ता सगळेच खोटे सांगणाऱ्या या मुलीमुळे पोलिसांना खूपच त्रास झाला. भोसरी पोलिसांनी तर एसएससी बोर्डात जाऊन सर्व कागदपत्रे खंगाळून मुलीचा पत्ता आणि नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु हा सगळाच बनाव असल्यामुळे काहीही हाती लागले नाही आणि अखेर कळाले की मुलगी धादांत खोटे बोलत आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या रस्त्यावर एक 16 वर्षाची मुलगी रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत फिरताना दिसली. तिला एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बालसुधारगृहात नेले. यावेळी मुलीने बरेच काही खोटे सांगितले. अनाथ असून नातेवाईकाकडे राहते, त्या नातेवाईकाने गैरफायदा घेऊन एक वर्षापासून सतत लैंगिक अत्याचार होत असल्याने नागपूरला पळून आल्याची धक्कदायक माहिती तिने दिली. मुलीने हे सांगताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आणि त्या नराधमाला शोधण्यासाठी नागपूरमध्ये गुन्हा दखल करण्यात आला. मुलीने हा प्रकार भोसरीत घडला असल्याचे सांगितल्याने भोसरी पोलिसांना माहिती देण्यात आली.

भोसरी पोलिसांनी त्वरित तपास चक्रे फिरवली व पूर्ण यंत्रणा कामाला लागली. मुलीने सांगितल्यानुसार सर्व परिसर पिंजून काढला मात्र हाती काहीच लागत नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून दहावी बोर्डातून माहिती काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती पुण्यात शिक्षण घेत नसल्याचे समोर आले. याच दरम्यान मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता कोणत्याही स्वरूपाचे लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांना झटकाच लागला आणि त्यांनी मुलीची अधिक चौकशी केली. त्यानंतर तिने नागपूरलाच राहायला असून वडील रागवल्याने बालसुधारगृहात राहण्यासाठी बलात्काराचा बनाव रचल्याचे माहिती दिली. भोसरीचा काहीही संबंध नसताना केवळ मुलीने आपल्या बनावात भोसरीचे नाव घेतल्याने भोसरी पोलिसांना खूप मेहनत करावी लागली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात कोणत्याच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला नाही. मात्र तपासासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ झाल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)