बलात्कारप्रकरणी तरुणाचा जामिन फेटळला

पुणे – क्‍लासवरून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. ती मुलगी गर्भवती राहिली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. त्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे.

सतीश कमलाकर बिराजदार (रा.आंबेगाव पठार, मूळ. कर्नाटक) असे जामिन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत त्या 15 वर्षीय मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील एका शाळेच्या मैदानावर 15 नोव्हेंबर 2016 रोजी घडली. दहावीत शिकत असलेली पीडित मुलगी घटनेच्या दिवशी क्‍लास संपवून घरी चालली होती. त्यावेळी बिराजदार याने तिला पकडून शाळेच्या मैदानावर नेत तेथे तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्या पूर्वी सहा ते सात महिने आधिपासून बिराजदार हा त्या मुलीचा पाठलाग करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी बिराजदार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. जामिन मिळावा, यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला होता.

या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. बिराजदार याने त्या मुलीवर अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासावरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. ते बाळ त्याचेच आहे का, हे पाहण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे नोंदविलेल्या जबाबामध्येही त्या मुलीने बिराजदार याने अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तरीही गुन्ह्याची गंभीरता कमी होत नाही. जामिन मिळाल्यास त्या मुलीला आणि तिच्या बाळाला बिराजदार याच्यापासून धोका आहे. त्यामुळे त्याचा जामिन फेटाळावा, असा ऍड. बोंबटकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बिराजदार याचा जामिन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)