बर्फाचा गोळा खाताय? सावधान!

रुपेश पाईकराव

पिंपरी – कडाक्‍याचे ऊन, असह्य उकाडा यामुळे जीवाची लाही-लाही होत असताना कोणाचीही पावले उसाच्या गुऱ्हाळाकडे अथवा बर्फाच्या गोळ्याकडे वळाली नाही तर नवलच! परंतु, जे आपल्या पुढ्यात येतयं ते खाण्यायोग्य आहे की अयोग्य आहे, हेही पाहणे गरजेचे आहे. सरबत, गोळा आईस्क्रीमचे विक्रेते वापरत असलेला बर्फ शरीराला अपायकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी उसाची गुऱ्हाळे, आईस्क्रीम, थंड पेयाची दुकाने थाटली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ वापरला जातो. हा बर्फ खाण्यायोग्य आहे का, याची खबरदारी घेवूनच शीतपेय, आईस्क्रीमचा आनंद लुटावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

अन्न सुरक्षा व माणक कायद्यानुसार खाद्य बर्फ कुठला आणि अखाद्य बर्फ कुठला, याची ओळख व्हावी, म्हणून महाराष्ट्र राज्यात बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये, तसेच अखाद्य बर्फात अन्न सुरक्षा कायद्यात नमूद केल्याप्रमाणे खाद्योपयोगात वापरण्यात येणारा रंग इंडिगो कारमाईन किंवा ब्रिलियंट ब्लू एफसीएफ (किमान 10 पीपीएम) रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल, एवढा खाद्य रंग टाकण्यास अन्न व औषध प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र, तसे न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात काही ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांशी संवाद साधल्यानंतर काही घटना समोर आल्या. रस्त्यावर ज्यूस, उसाचा रस आणि बर्फाचा गोळा विकणाऱ्यांना हेच माहीत नाही की त्यांना बर्फाच्या लाद्या कोण पुरवत आहे. ते सांगतात, कीसकाळी टेम्पो येतो. त्यांच्याकडून ते बर्फाच्या लाद्या घेतात आणि संध्याकाळी टेम्पोवाले पैसे घ्यायला येतात. येवढाच त्यांच्याशी संपर्क असल्याची माहिती शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणावर विक्री करणारांकडून समजली. बर्फाच्या लाद्या पुरवणारे कोण आहेत? तो बर्फ कोठून येतो. याची माहिती विचारली असता काहींनी ती देण्यास टाळाटाळ केली.

नागरिकांनी नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच शीतपेय घ्यावी. विक्रेत्यांनी त्यांचा व्यवसाय नोंदणीकृत असल्याचे फलक दुकानात दर्शनी भागात लावावे. बर्फ विक्रेत्यांनी किंवा उत्पादकांनी खाद्य बर्फ उत्पादन अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत स्वच्छतेचे नियम पाळून बर्फाची विक्री आणि उत्पादन करावे. त्याचप्रमाणे शीतपेय विक्रेत्यांनी देखील अधिकृत बर्फ विक्रेत्यांकडून बर्फ खरेदी करावा. औद्योगीक बर्फ उत्पादकांनी शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार खाद्य रंगाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व औषध विभागाचे सह आयुक्‍त शिवाजी देसाई यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)